Twitter: @maharashtracity

मुंबई: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे नेते आणि विधान परिषद सदस्य ऍड अनिल परब यांच्या दापोली येथील तथाकथित रिसॉर्ट प्रकरणी दोषी धरून सक्त वसुली संचालनालय अर्थात इडी ने आज सदानंद कदम यांना अटक केली. त्याआधी त्यांची चार तास चौकशी सुरु होती.

भारतीय जनता पक्षाचे नेते डॉ किरीट सोमय्या हे गेले काही महिने अनिल परब यांच्या अवैध बांधकाम संदर्भात विविध तपास यंत्रणांकडे तक्रार करत असून परब यांची चौकशी व्हावी अशी मागणी करत आहेत. कोकणातील दापोली येथील रिसॉर्टची मालकी अनिल परब यांची असल्याचा दावा करून सोमय्या यांनी या रिसॉर्टचे बांधकाम अवैध असल्याच्या तक्रारी केल्या होत्या.

त्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी होऊन पर्यावरण नियमांचे उल्लंघन आणि अवैध बांधकामाचा ठपका ठेवून रिसॉर्टचे बांधकाम पाडण्यात आले होते. दरम्यान, हे रिसोर्ट आपले नसून सदानंद कदम यांचे असल्याचं अनिल परब वारंवार करत होते. दरम्यान, ईडी ने सदानंद कदम यांची आज चौकशी करून त्यांना अटक केली आहे.

या प्रकरणी मनी लॉनड्रिंग झाल्याचा आरोप करत ईडी ने गुन्हा दाखल केला होता. आज दुपारी जवळपास 3.30 वाजल्यापासून सदानंद कदम हे ईडी कार्यालयात आले होते. जवळपास चार तासाच्या चौकशीनंतर सदानंद कदम यांना ईडी ने अटक केली. दापोली रिसॉर्ट प्रकरणी झालेली ही पहिली अटक आहे. कदम यांना रिमांडसाठी उद्या विशेष ईडी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

सदानंद कदम हे शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांचे बंधू असले तरी दोन्ही भावात अजिबात मधुर सबंध नाहीत असे सांगितले जाते. तर सदानंद कदम हे अनिल परब यांचे विश्वासू असून दोघांत व्यावसायिक सबंध असल्याचे म्हटले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here