@maharashtracity

धुळे: एटीएम सेंटरवर पैसे काढण्यास आलेल्या नागरीकांकडून एटीएम कार्ड हातचलाखीने बदलून त्याचे क्लोनिंग Cloning of ATM card) करीत परस्पर बँक खात्यातून पैसे लुबाडणारी आंतरराज्य टोळी धुळे पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने आज धुळ्यात सापळा लावून जेरबंद केली आहे.

या कारवाईमुळे अनेक ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आज दि. १ ऑक्टोबर रोजी सकाळी एलसीबीला गुप्त माहिती मिळाली की हरियाणा पासिंगची एक्सयुव्ही कार क्र. एचआर-८०-डी-३९८२ हि मालेगांवकडून (Malegaon) धुळ्याकडे (Dhule) येत आहे. या कारमध्ये एटीएम कार्ड क्लोनिंग फसवणुक करणार्‍या टोळीचे लोक आहेत. त्या आधारे एलसीबी पथकातील पोलीस कर्मचारी यांनी चाळीसगांव रोड चौफुलीजवळ सापळा लावला. तसेच ती कार अडवून चार जणांना ताब्यात घेतले.

यात विजयकुमार पालाराम राजपूत – वय ३५, सुनिलकुमार धुपसिंग राजपूत – वय ३२, शिवकुमार चंदकिशोर शर्मा – वय ३८ आणि एक अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. हे सर्व बरवाला, जि. हिसार, हरियाणा (Haryana) येथील रहिवाशी आहेत.

त्यांच्या कारची झडती घेतली असता, त्यातून १ लाख ३० हजार रुपयांची रोख रक्कम, २० हजाराचे ७ मोबाईल, ८ लाखाची कार, ६ हजाराचे एटीएम कार्ड स्वाईप व क्लोन करण्याचे स्कीमर मशिन, ३ हजाराचे स्कीमर मशिन आणि वेगवेगळ्या बँकेचे एकूण ६६ एटीएम कार्ड असा एकूण ९ लाख ५९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या टोळीची एलसीबी पथकाने कसून चौकशी केली असता, त्यांनी देवपूरातील पंचवटी टॉवर जवळील एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या व्यक्तीचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलून त्याचे क्लोनिंग करून त्या व्यक्तीच्या बँक खात्यातील एकूण ३ लाख ८० हजार रुपये काढल्याची तसेच इतर ठिकाणीही अशाच प्रकारे वेगवेगळ्या ५ ठिकाणी पैसे काढल्याची कबुली दिली आहे.

तसेच नाशिक, पुणे, ठाणे, मुंबई, नागपूर, यवतमाळ, धुळे या जिल्ह्यात राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, हरियाणा, उत्तरप्रदेश, दिल्ली इतर राज्यांमध्येही वेगवेगळ्या ठिकाणी अनेकांचे एटीएम कार्ड अदलाबदल करून मोठ्या प्रमाणात पैसे हडपण्याचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

या सर्व टोळक्याडून आणखीन मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here