पतीच्या मित्रानेच खून केल्याचा संशय

@maharashtracity

धुळे:  देवपूरातील वाडीभोकर परिसरात एका महिलेचा निघृण खून झाला. मृत महिलेच्या पतीच्या मित्रानेच हा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मारेकरी खून (murder) करुन पसार झाल्याने खूनामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या प्रकरणी पश्‍चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल झाल आहे.

शीतल भिकन पाटील (वय 25, रा.कापडणे, ह.मु.जगन्नाथ नगर, वाडीभोकर रोड धुळे) या महिलेचा सोमवारी दुपारी खून झाला. तीचा पती भिकन पाटील हा घरी आल्यानंतर तो पत्नीच्या खोलीत गेला असता त्याला शीतल रक्ताच्या थारोळ्यात निपचीत पडलेली दिसली. शीतलच्या मानेवर धारदार शस्त्राने अनेक वार केल्याचे  दिसत होते. 

दरम्यान, भिकनचा मित्र सोमनाथ कौर (रा.कापडणे ता.धुळे) हा काही वेळेआधीच घरातून बाहेर पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यामुळे हा खून कौर यानेच केला असल्याचा संशय आहे. तसेच घराजवळील सीसीटीव्ही कॅमेर्‍यातही कौर हा घरातून बाहेर पळतानाचे चित्रण पोलिसांच्या हाती लागले आहे. 

कौरचा शोध घेतला असता तो त्याच्या कापडणे गावातील घरीही नसून त्याचा मोबाईलही बंद येत असल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक दिनकर पिंगळे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी भिकन पाटील याच्याकडून कौर विषयी माहिती जाणून घेतली. या प्रकरणी पश्‍चिम देवपूर पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here