By Sambhaji Gayake

Twitter: maharashtracity

२ जूनच्या सायंकाळी ओडिशातील बालासोरमध्ये उगवलेला चंद्र जणू दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेच्या तयारीत असावा,  इतका सुंदर दिसत होता. परंतु, त्या चंंद्राच्या अगदी समोरच मानवी जीवनावर मृत्यूचे काळे वादळ घोंगावत येत होते. श्वासांच्या चंद्राला ग्रहण लागताना आकाशातील चंद्र हताश होऊन पहात होता! काहीच क्षणांमध्ये खग्रास अवस्था झाली आणि काळोख पसरला. किंकाळ्यांनी आसमंत थरथरून गेलेला असताना त्याला सावरायला कुणीतरी धावून यायला हवं होतं…… आणि तसं कुणीतरी धावत आलंच!

दत्तात्रय भाऊसाहेब शिंंदे त्यांचं नाव. जीवघेण्या रेल्वे अपघाताची खबर मिळाल्या क्षणापासून केवळ चाळीस- पंचेचाळीस मिनिटांत जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्यायदंडाधिकारी, भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी श्री. दत्तात्रय भाऊसाहेब शिंंदे दुर्घटनास्थळी पोहोचले! घटनास्थळाकडे वेगाने जात असताना जसजशी त्यांना घटनेच्या गांभिर्याची माहिती मिळत गेली तसतसे त्यांनी आपलं प्रशासकीय आणि संपर्क कौशल्य पणाला लावून योजना आखल्या. 

तीन पैकी दोन रेल्वेगाड्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या..याचा अर्थ जिवितहानी मोठ्या प्रमाणावर असेल याचा अंदाज बांधून साहेबांनी परिसरातील थोड्याथोडक्या नव्हेत, तर शंभरपेक्षा अधिक रूग्णवाहिका उपलब्ध करून घेतल्या. जवळच्या सर्वच्या सर्व रूग्णालयांना हाय अलर्टवर आणले. उपलब्ध असलेले सर्व वैद्यकीय अधिकारी कार्यक्षेत्रात कार्यरत असतील, अशी तजवीज केली. संपूर्ण बालासोर जिल्हा प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लावली. घटनास्थळी पोहोचताच परिस्थितीचा आढावा घेतला आणि भारतीय सेनेकडे मदत मागितली. एका रेल्वेगाडीत अडकून पडलेल्या बी.एस.एफ.च्या दहा जवानांनी स्वत: जखमी असूनही प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी कंबर कसली! 

अशावेळी बघ्यांची गर्दी उपद्रवक्षम असते. पण याच गर्दीला शिंदे साहेबांनी मोठ्या कौशल्याने प्रोत्साहित करून कामाला लावले. जखमींना रूग्णालयात पोहोचवण्याला सर्वाधिक प्राधान्य दिले. मृतदेह सरकारी रूग्णालयांंत हलवण्यात वेळही गेला असता आणि जखमींना घेऊन जाण्यासाठी रूग्णवाहिका कमी पडल्या असत्या. गेलेल्यासाठी शोक करीत न बसता राहिलेल्यांसाठी सर्व ताकद वापरण्यावर भर दिला. जवळच्याच एका शाळेच्या इमारतीत उपलब्ध असलेल्या जागेत सर्व मृतदेह व्यवस्थित ठेवण्याची सूचना दिल्या. मृतदेहांची उत्तरीय तपासणी ही आत्यंतिक महत्त्वाची प्रक्रिया असते. तज्ज्ञ डॉक्टरांसाठी उत्तरीय तपासणीची सर्व व्यवस्था त्याच ठिकाणी केली गेली. अपघाताच्या तीव्रतेमुळे मृतदेहांची अवस्था अत्यंंत शोचनीय झालेली असल्याने आणि ओळख पटविणे कायद्याच्या दृष्टीने योग्य व्हावे यासाठी मृतदेहांचे डी.एन.ए. नमुने घेण्याचे आदेशही लगोलग दिले गेले. 

शिंंदे साहेब बालासोरमधील माणसांना ‘माझी’ माणसं, माझ्या रक्ताची माणसं’ असं संबोधतात. याच रक्ताला त्यांनी आवाहन केलं आणि अपघातात वाहून गेलेल्या रक्तापेक्षा थेंबभर जास्तच रक्त दान केलं गेलं….. इतकं की रक्त साठवण क्षमता संपुष्टात आल्यानं रक्तदात्यांना माघारी पाठवावं लागलं. अपघातग्रस्तांसाठी सर्व रुग्णालयांत, सर्वच रूग्णांवर मोफत उपचार होतील, अशा स्पष्ट सूचना दिल्या गेल्या. हे सर्व नियोजन आणि अंमलबजावणी करत असताना वृत्तवाहिन्यांचा ससेमिरा, अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटी सुरू झाल्या. त्याचेही नियोजन करावे लागते. माहिती नेमकी जमा करून घ्यावी लागते. बहुतेक वेळा याच कामांत प्रशासनाची बरीचशी शक्ती नाहक खर्च होत असते. परंतू मदत आणि माहिती या दोन्ही पातळींवर शिंंदेसाहेब आणि त्यांचा प्रशासकीय वर्ग सारखाच यशस्वी ठरताना दिसला. 

अपघातात किती लोक दगावले या आकडेवारीत आजच्या मिडीयाला खूपच स्वारस्य दिसते. त्यांना थोडंसं रोखलं की लगेच मृतांचा आकडा लपवला जातोय, अशी ओरड होते. म्हणून या घटनेच्यावेळी मदतकार्यात अडथळा येऊ नये अशा पद्धतीने वृत्तवाहिन्या, बातमीदारांना घटनास्थळी त्यांचे काम करू देण्यात आले. 

रेल्वेप्रशासन, रेल्वे पोलिस, स्थानिक पोलिसदल, आरोग्य यंत्रणा, वाहतूक विभाग, भारतीय सैन्य दल, मिडीया या सर्वांमध्ये समन्वय राखण्यासाठी एक सुव्यवस्थित प्रशिक्षण झालेलं सक्षम मन असावं लागतं. पुस्तकांतून वाचलेल्या अनेक गोष्टी अशावेळी प्रत्यक्ष अंमलबजावणीत आणाव्या लागतात. 

The hour throws the man….असं म्हटलं जातं… अर्थात तो क्षण एक असा सक्षम माणूस निवडतो आणि त्याला लढण्याची प्रेरणा देतो. असंच काहीसं झालं शिंदे साहेबांच्या बाबतीत. त्या क्षणाने अगदी योग्य माणूस निवडला होता…. हे दिसून आले! या महाकाय कार्यात दत्तात्रय शिंंदे साहेब काही एकटेच नव्हते हे साहजिक असले तरी नेतृत्व म्हणून जो काही गुण असतो, त्याचं महत्त्व असतंच. किंबहुना अचूक आणि तात्काळ निर्णय हे जीवनमरणातील सीमारेषा ठरवत असतात.  

प्रशासन हा आपल्या या समाजाचा कणा आहे. तो जितका कणखर आणि ताठ तेव्हढी आपत्तींची तीव्रता कमी. कारण आपत्ती संपूर्णपणे टाळता येत नसतात….. त्यांचं निवारण मात्र करता येतं. हेच शिंदेसाहेबांनी आणि त्यांच्या बालासोरवासियांनी दाखवून दिलेले आहे. 

आपल्यासाठी यातील एक सुखावह बाब म्हणजे हे मराठी रक्त आहे….. ओडिशासारख्या दूरच्या राज्यात एक मराठी नाव आपल्या कर्तृत्वाने झळकते आहे, हे आपल्याला अभिमानास्पद असायला हवे. नगर जिल्ह्यातल्या एका छोट्या गावातून येऊन, आपल्या कष्टाच्या जोरावर राष्ट्रीय प्रशासकीय सेवेत प्रवेश करणे आणि प्रसंग पडताच ज्यासाठी देशाने नेमणूक केली आहे, ते काम धीरोदात्तपणे अंमलात आणणे… याला अद्वितीय धाडस लागते… की जे श्री. दत्तात्रय भाऊसाहेब शिंदे यांनी करून दाखवलेले आहे! 

एका काल्पनिक कथेतील एक पात्र साधारणत: अशा आशयाचं एक वाक्य म्हणतं…It is not important who I am underneath…. what I do is important! अर्थात मी वरून कसा दिसतो किंवा आतून कसा आहे यापेक्षा मी प्रत्यक्षात काय कृती करतो… ते सर्वाधिक महत्त्वाचे आहे! श्री. शिंंदे साहेबांनी जे काही केलं ते सर्व त्यांच्या कर्तव्याचा एक भाग होते, असे जरी असले तरी हे कर्तव्य करत असताना त्यांनी दाखवलेली समयसूचकता, निर्णयक्षमता अतिशय वाखाणण्याजोगी आहे, यात दुमत असण्याचं काही कारण नाही. 

कुणी पाहो न पाहो…. जग आपल्या कृतींकडे पहात असते…. त्या नजरेस आपण पात्र असलो की बाकी कशाचं काहीही महत्त्व रहात नाही, हे खरेच. या भयावह प्रसंगात मदतीचा हात पुढे केलेल्या सर्वांना परमेश्वर दीर्घायुरारोग्य देवो, ही प्रार्थना. मराठी मातीने देशाला एक कर्तृत्ववान सेवक दिला आहे, याचा एक मराठी भारतीय म्हणून आपल्यालाही अभिमानच वाटेल. लिहिताना अभिमानाच्या भरात एखाद- दोन बाबी जास्तीच्याही लिहिल्या गेल्या असतील. पण आताच्या जगातील नकारात्मक अन्वयार्थाच्या काळ्या आभाळात श्री. दत्तात्रय भाऊसाहेब शिंदे यांच्या त्रिगुणात्मक कार्याचा चंद्रप्रकाश सर्वांनाच सकारात्मक ऊर्जा देऊन जाऊ शकेल असं वाटलं… म्हणून हा लेखनप्रपंच. या लेखाच्या शेवटी वापरलेलं चंद्राचं छायाचित्र बहुदा स्वत: श्री. शिंंदे साहेबांनीच काढलेलं असावं…. ते त्यांच्या ट्वीटर हॅंडलवर दिसले! लेखातील माहिती अर्थातच विविध माध्यमांतून, बातम्यांतून जशी समजली तशी लिहिली आहे. तपशील प्रत्यक्ष काहीसा वेगळाही असू शकतो… याबद्द्ल दिलगीर आहे. चला, आपल्या मराठी पोराचं तोंडभरून कौतुक करूयात…. वचनं कीं दरिद्रता?

क्रिकेटमधला सूर्या किती दूरवर षटकार मारतो त्यापेक्षा हा आपला हा चंद्र किती उंचीवर पोहोचला आहे याची चर्चा सारा देश करेल… तो सुदिन! या रेल्वे दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या जीवांना श्रध्दांजली आणि जखमी असणा-यांना लवकर बरे वाटावे अशी सदिच्छा.

(लेखास प्रतिसाद म्हणून लाईक, कंमेट नाही केल्या तरी चालतील. पण आपल्या मुलांना या आणि अशा मराठी माणसांबद्दल अधिकाधिक सांगत जाऊ… दुर्घट्नांना कसा उत्तम प्रतिसाद दिला जाऊ शकतो, याचाही अभ्यास व्हावा. उत्तम प्रशासन म्हणजेच उत्तम समाज… हे तत्व लक्षात ठेवू.)

लेखक – संभाजी बबन गायके

9881298260. 

(छायाचित्र श्री. दत्तात्रय भाऊसाहेब शिंदे यांच्या ट्विटर हॅंडलवरून साभार.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here