Twitter : @milindmane70

महाड

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असलेल्या महाड तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील 15 दरडग्रस्त गावातील 177 कुटुंबातील 468 नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांनी दिली.

कोकणातील वाढते पर्जन्यमान व हवामान खात्याच्या अंदाजानुसार अतिवृष्टी व भूस्खलन होऊन जीवित व वित्तहानी टाळण्याच्या उद्देशाने तहसीलदार महेश शितोळे व प्रांताधिकारी ज्ञानोबा बानापुरे यांनी लक्ष घातले आहे. प्राप्त माहितीनुसार या नागरिकांचे स्थलांतर कॅम्प क्रमांक 11 मध्ये करण्यात आले आहे.

स्थलांतरित केलेल्या कुटुंबांची माहिती पुढील प्रमाणे : लोअर पुढील (नामावलकोंड) कुटुंब संख्या 15 असून 74 लोकांचे स्थलांतर केले आहे. मोरेवाडी (सिंगर कोंड) या गावातील 17 कुटुंबातील 32 लोकांचे स्थलांतर केले आहे. कुरले पातेरेवाडी (आंबिवली बुद्रुक) या गावातील 11 कुटुंबातील 29 लोक नातेवाईकांकडे स्थलांतरित झाले आहेत. वडवली (कोंडीवते मूळ गावठाण) या गावातील चार कुटुंबातील 11 लोकांचे स्थलांतर केले आहे. मुठवली गावातील आठ कुटुंबातील 31 लोकांचे स्थलांतर केले आहे तर त्या गावातील दोन कुटुंबातील सहा लोकांनी आपल्या नातेवाईकांकडे स्थलांतर केले आहे.

रोहन हे गाव सन 2005 मध्ये देखील दरडग्रस्त होते. आता त्या गावातील 25 कुटुंबातील 60 लोकांना स्थलांतरित केले आहे. कोठेरी जंगमवाडी या वाडीवरील दहा कुटुंबातील 20 लोकांचे स्थलांतर केले आहे. कोसंबी गावातील 11 कुटुंबातील 51 लोकांचे स्थलांतर केले आहे. रावतळी मानेची धार या वाडीवरील वीस कुटुंबातील 53 लोकांचे स्थलांतर केले आहे. मोहोत (सुतारवाडी व भिसे वाडी) या गावातील दोन वाड्यांवरील 17 कुटुंबातील 50 लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. मांडले गावातील चार कुटुंबातील पंधरा लोकांनी आपल्या नातेवाईकांकडे स्थलांतर केले आहे. तासगाव हे महाड तालुक्यातील सन 2005 मधील दरडग्रस्त गाव आहे. या गावातील अद्यापही काही नागरिकांचे पुनर्वसन झालेले नाही. त्यातच या गावातील सहा कुटुंबातील 29 लोकांनी आपल्या नातेवाईकांकडे स्थलांतर केले आहे.

कोठेरी(तांदळेकरवाडी) या गावातील या वाडीवरील 26 कुटुंबातील 55 लोकांचे पुनर्वसन कॅम्प मध्ये तर नऊ कुटुंबातील 19 लोकांनी आपल्या नातेवाईकांकडे स्थलांतर केले आहे. गोडाळे (कुडवेवाडी) या वाडीवरील नऊ कुटुंबातील 38 लोकांनी आपल्या नातेवाईकांकडे स्थलांतर केले आहे. कोठेरी (मूळ गावठाण) या वाडीवरील चार कुटुंबातील 31 लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

महाड तालुक्यात आतापर्यंत पावसाळा सुरू झाल्यानंतर दहा घरांचे नुकसान झाले आहे. तर एका ठिकाणी जनावरांच्या गोठ्याचे नुकसान झाले आहे. तसेच सार्वजनिक मालमत्तेचे दोन ठिकाणी नुकसान झाले आहे. महाड तालुक्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमी 11 निवारा कॅम्पमध्ये 177 कुटुंबातील 468 लोकांना स्थलांतर केले आहे तर 41 कुटुंबातील 136 लोकांनी आपल्या नातेवाईकांकडे स्थलांतर केले आहे.

महाड तालुका दरडग्रस्त व पूर प्रवण क्षेत्रात येत असल्याने आपत्कालीन परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी प्रांताधिकारी ज्ञानोबा बानापुरे व तहसीलदार महेश शितोळे हे प्रत्यक्ष आपत्कालीन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यामार्फत वारंवार आढावा घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here