Twitter: @Rav2Sachin

मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सभासदांना दादासाहेब फाळके चित्रनगरीत (फिल्मसिटी ) प्रवेश नाकारला जात असल्याच्या विरोधात प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी महामंडळाच्या सभासदांनी तीव्र आंदोलन केले.

महामंडळाचे सभासद आणि कला दिग्दर्शक वासू पाटील हे गेली २५ ते ३० वर्ष चित्रपट सृष्टीत काम करत असतानाही त्यांना काही दिवसांपूर्वी अचानक चित्रनगरीच्या प्रवेशद्वरावर अडवणूक करून आत जाण्यास मज्जाव करण्यात आला.

मला प्रसिद्ध अभिनेते अमोल कोल्हे यांनी चित्रनगरीत बोलावले होते. तसे मी प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकांना सांगितले देखील, तरी ते चित्रनगरीत प्रवेश देत नव्हते. माझ्याजवळ अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे ओळखपत्र आहे. ते ओळखपत्र दाखवूनही चित्रनगरीत जाऊ दिले नाही, असे पाटील यांनी सांगितले.

आज ही घटना एका सभासद वर घडली आहे. उद्या असेच चालू राहिले तर, असा प्रश्न निर्माण पुन्हा उद्भवू शकतो. याची गंभीर दखल घेत पाटकरांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले गेले.

महाराष्ट्रात मराठी माणूस आणि मराठी माणसाला काम करायला अडवणारे हे कोण ? कोण आहे रे यांचा हुकूमशहा..! असे अनेक प्रश्न महामंडळाच्या सभासदांनी चित्रनगरीच्या प्रवेशद्वारावर विचारले.

यावेळी चित्रनगरीचे व्यवस्थापक विजय भा. भालेराव यांना याबाबत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ जागरूक सभासदांच्या वतीने पाटकर यांच्या सोबत आलेल्या शिष्टमंडळातर्फे निवेदन देण्यात आले.

चित्रनगरीच्या प्रवेशद्वाराजवळ सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक वासू पाटील यांना प्रवेश नाकारला व त्यांना अपमानास्पद वागणूक दिली गेली. यावर त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच यापुढे कुठल्याही मराठी कलाकाराला अथवा तांत्रिकी कर्मचाऱ्यांना अडविण्यात येऊ नये, असे सांगण्यात आले.

याची दखल घेत यासंबंधी सूचना सिक्युरिटी गार्डना करण्यात येईल असे विजय भा. भालेराव यांनी यावेळी सांगतले. तसेच घडलेल्या प्रकाराबाबत भालेराव यांनी दिलगिरी व्यक्त करत असा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून फिल्मसिटीच्या संचालकांना कळविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

या आंदोलनात महामंडळाचे २०० सभासद सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here