Twitter : @milindmane70

महाड

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या महाड तालुक्यातील पारमाची गावावर 29 वर्षांपूर्वी दरड कोसळून 13 जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. या गावातील घरांना पुन्हा पडलेल्या भेगांमुळे ग्रामस्थ भयभीत झाले असून त्याच घटनेची पुनरावृत्ती होते की काय या भीतीच्या सावटाखाली येथील ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन जगत आहेत.

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये व वरंधा घाटाच्या कुशीत वसलेल्या पारमाची या गावावर 28 जून 1994 रोजी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा मातीच्या ढिगाऱ्याखाली मृत्यू झाला होता, तर अनेक घरे व पाळीव जनावरे या दरडीखाली गाडली गेली होती. त्याच गावात पुन्हा एकदा घरांना तडे गेले असून अनेक घरे कोसळण्याच्या स्थितीत आहेत.

पारमाची गावाची लोकसंख्या 255 आहे. हे गाव सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये बसलेले आहे. अगदी डोंगराला खेटुनच घरे असल्याने या गावातील नागरिक पावसाळ्यात 1994 च्या घटनेनंतर कायम भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.

पारमाची गावातील घरांना तडे गेल्याने नागरिक व ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. याबाबत महाड तहसीलदार महेश शितोळे व प्रांताधिकारी ज्ञानोबा बानापुरे यांनी तातडीने दखल घेऊन तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या सहाय्याने या गावातील ज्या घरांना तडे गेले आहेत, त्यांचे पंचनामे करून वस्तुस्थिती जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. पारमाची गावातील सद्यस्थितीत चार घरे, एक मंदिर व ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी वास्तूंना तडे गेले आहेत. तसेच गावातील अंतर्गत रस्ता सुमारे दीड फूट खचला आहे, तर मुख्य रस्ता मागील दोन वर्षांपूर्वीच खचले असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. वेळ पडल्यास या गावातील नागरिकांना स्थलांतरित करण्याबाबत व पर्यायी जागेत त्यांचे स्थलांतरित करण्याबाबत उपाययोजना चालू केल्या आहेत, असे तहसीलदारांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here