एक्सबीबी व्हेरिएंट पार्श्वभूमीवर राज्य कोविड टास्क फोर्सच्या सूचना

@maharashtracity

मुंबई: राज्यात आतापर्यंत एक्सबीबी या कोरोना वेरियंटचे ३६ रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये कोणतीही वेगळी लक्षणे आढळून आलेली नाहीत. तसेच या ३६ रुग्णांपैकी दोन रुग्ण वगळता इतर सर्वांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण झालेले आहे. यातील ५ जणांनी बूस्टर डोस घेतलेला असून ६ रुग्णांमध्ये (१७.७ टक्के)  पुनः संसर्ग (रिइन्फेक्शन) आढळून आले. 

दरम्यान, एका बैठकीत लॉन्ग कोविड सिंड्रोमबद्दल कोविड टास्क फोर्स सदस्यांनी चिंता व्यक्त केली. सध्या राज्यात मधुमेह, ब्रेन फॉग आणि हृदयविकारांच्या घटनांमध्ये काही वाढ होताना दिसत आहे. म्हणूनच कोविड होऊन गेलेल्या रुग्णांचे नियमित मॉनिटरिंग आणि पाठपुरावा करण्याची आवश्यकता टास्क फोर्सने सूचना केली आहे.

दरम्यान, राज्यात जिल्हानिहाय पाहिल्यास पुणे जिल्ह्यात २१, ठाणे १०, नागपूर २ आणि अकोला, अमरावती, रायगड येथे प्रत्येकी १ असे सांगण्यात आले. तर वयोगटाप्रमाणे यातील २ रुग्ण ११ ते २० या वयोगटातील असून २१ ते ४० या वयोगटात १३ रुग्ण आहेत. तर ४१ ते ६० या वयोगटात १४ आणि ६० वर्षावरील ७ रुग्ण आहेत. यातील २२ पुरुष तर १४ स्त्रिया आहेत.

या ३६ जणांपैकी १९ रुग्णांना काही लक्षणे होती. तर उर्वरित रुग्ण लक्षणेविरहित किंवा सौम्य स्वरूपाचे होते. 

दरम्यान, हे ३२ रुग्ण घरगुती विलगीकरणात बरे झाले तर ४ रुग्णांना केवळ खबरदारीचा उपाय म्हणून अथवा घरगुती विलगीकरण सुविधा नसल्याने रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र, त्यांना ऑक्सिजन अथवा व्हेंटिलेटरची गरज भासली नाही.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कोविड टास्क फोर्स तज्ज्ञांची सोमवारी २४ ऑक्टोबर २०२२ रोजी बैठक झाली. या बैठकीत सर्व तज्ञांनी सद्यस्थितीचा विचार करून राज्याला सूचना दिल्या आहेत.  यानुसार राज्यातील तसेच सिंगापूर आणि इतर देशांमधील एक्स बी बी या वेरियंटचा अभ्यास करता या नव्या वेरियंटमुळे संसर्गाचे प्रमाण काही प्रमाणात वाढले तरी हा नवा व्हेरियंट सौम्य स्वरूपाचा असल्याची बाब दिलासादायी आहे. यातील बहुसंख्य रुग्णांना घरगुती विलागिकरणात उपचार देणे शक्य आहे. अगदी कमी रुग्णांना रुग्णालयामध्ये भरती करावयाची गरज भासेल. 

दरम्यान, लॉन्ग कोविड सिंड्रोमबद्दल कोविड टास्क फोर्स सदस्यांनी चिंता व्यक्त केली. सध्या राज्यात मधुमेह, ब्रेन फॉग आणि हृदयविकारांच्या घटनांमध्ये काहीशी वाढ होताना दिसत आहे. म्हणूनच सार्वजनिक ठिकाणी मास्कची सक्ती नसली तरी रुग्णालये, दवाखाने यांच्या परिसरात आरोग्य कर्मचारी आणि इतर सर्वांनी मास्क वापरणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. 

राज्यात ३१९ नवीन रुग्णांचे निदान

शनिवारी राज्यात ३१९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ८१,३१,४५८ झाली आहे. काल ४०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले, राज्यात आजपर्यंत एकूण ७९,८१,५४१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१६% एवढे झाले आहे. 

राज्यात आज रोजी एकूण १५३२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच राज्यात शनिवारी दोन कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,५२,२७,६९४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,३१,४५८ (०९.५४  टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबईत १३२ बाधित

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १३२ एवढे कोरोना रूग्ण आढळले. आता मुंबईत एकूण ११,५२,९३८ रुग्ण आढळले. तसेच ० रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १९,७३८ एवढी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here