@maharashtracity

मुंबई: राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (SDRF) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत कोकण आपत्ती सौम्यिकरण प्रकल्पावर पाच वर्षात सुमारे 3 हजार 635 कोटी रुपये निधी देण्यास मान्यता देण्यात आली.

कोवीड 19 च्या उपाययोजनांसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीत 1700 कोटी रुपये निधी उपलब्ध आहेत. बदलत्या हवामानामुळे निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी प्राथमिकता ठरवून नियोजन करण्याची सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिली.
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली.

यावेळी कोकण आपत्ती सौम्यिकरण प्रकल्पासाठी पाच वर्षात सुमारे 3 हजार 635 कोटी रुपये निधी देण्यास मान्यता देण्यात आली. यामध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून 2 हजार कोटी तर राज्य शासनाच्या इतर निधीतून 1600 कोटी देण्यात येणार आहेत. तसेच दुष्काळ निवारण कार्यक्रम- पेंच प्रकल्प नागपूर हा प्रकल्पाच्या मंजुरीसाठी मंत्रीमंडळ बैठकीत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, जगभरात तिसऱ्या लाटेची चर्चा आहे. कोवीड लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्यांची चाचणी करावी का, बुस्टर डोस घ्यावा का याबद्दल चर्चा सुरू आहे. याबरोबरच निर्बंध शिथिल करण्याचीही मागणी होत आहे. त्यामुळे राज्य शासनाने विविध उद्योजकांबरोबर चर्चा करून कोवीड प्रोटोकॉल पाळून कामे सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. हात धुणे, मास्क वापरणे व योग्य अंतर राखणे या उपाययोजनांवर भर देऊन कामे सुरू करण्याच्या सूचना उद्योजकांना केल्या आहेत. त्याचबरोबर उद्योग परिसरात कामगारांची राहण्याची तयारी करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. त्यासाठी राज्य शासन मदत करण्यास तयार आहे, असेही श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here