अंधेरी-वर्सोवाला पूरस्थितीपासून दिलासा
मोगरा सातवा पंपिंग स्टेशन बनणार
हाजीअली, लव्हग्रोव्ह, क्लिव्हलॅन्ड, इर्ला, ब्रिटनिया, गझधरबंध पंपिंग कार्यान्वित
@maharashtracity
मुंबई: मुंबईत २६ जुलै २००५ च्या पूरस्थितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नियुक्त चितळे समिती व ब्रिमस्टोवॅड अहवालानुसार पावसाळ्यात सखल भागात मोठ्या प्रमाणात साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्याकरिता ८ ठिकाणी पंपिंग स्टेशन उभारण्याची शिफारस करण्यात आली होती. आतापर्यंत ६ पंपिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत. माहुल व मोगरा पंपिंग स्टेशनचे काम बाकी होते. मात्र आता पालिकेला ‘ मोगरा’ पंपिग स्टेशन उभारण्यासाठी मुहूर्त सापडला आहे.
यावर्षापासूनच या पंपिंग स्टेशनच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
मे. मिशीगन इंजिनिअर्स आणि मे. म्हाळसा कन्स्ट्रक्शन (संयुक्त) या कंत्राटदारांमार्फत तब्बल ३९३ कोटी रुपये खर्चून हे पंपिंग स्टेशन पुढील दोन वर्षात उभारण्यात येणार आहे. या पंपिंग स्टेशनच्या उभारणीमुळे पश्चिम उपनगरातील अंधेरी ते जोगेश्वरी आणि मालपाडोंगरी ते वर्सोवा येथील सखल भागात पावसाळ्यात जे पाणी मोठ्या प्रमाणात साचून नागरिकांना त्रास होत असे त्यापासून दिलासा मिळणार आहे.
यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.
मुंबईत २६ जुलै २००५ ला अतिवृष्टी झाली होती. त्याचवेळी समुद्राला मोठी भरती होती. एका दिवसात तब्बल ९४४ मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली होती. त्यामुळेच, मुंबईची तुंबई होऊन मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तीय हानी झाली होती. यातून मुंबईला व पालिकेला त्यामधून मोठा धडा शिकायला मिळाला होता. या पुरस्थितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी व कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी चितळे समिती नेमण्यात आली होती. तसेच, ब्रिमस्टोवॅडचा अहवालही सादर करण्यात आला होता. त्यानुसार पालिकेने सखल भागात मोठया प्रमाणात साचणाऱ्या पाण्याचा निचरा जलदगतीने करण्यासाठी शहर व उपनगरातील ८ ठिकाणी पावसाच्या पाण्याचा निचरा जलदगतीने होण्यासाठी मोठ्या क्षमतेचे पंपिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानुसार, २००५ पासून ते आतापर्यंत हाजीअली, लव्हग्रोव्ह, क्लिव्हलॅन्ड, इर्ला, ब्रिटनिया, गझधरबंध हे सहा पंपिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत. तर मोगरा व माहुल या दोन पंपिंग स्टेशनचे काम बाकी आहे. वास्तविक, जी सहा पंपिंग स्टेशन उभारण्यात आली आहेत, त्यांची कामे सुरू असतानाच जर मोगरा व माहुल या दोन्ही पंपिंग स्टेशनची कामे त्याचवेळी हातात घेतली असती तर आतापर्यंत हे दोन्ही पंपिंग स्टेशन पूर्ण झाले असते व कार्यान्वितही झाले असते.
त्यामुळे उशिराने का होईना अखेर पालिकेला ‘ मोगरा’ पंपिंगच्या कामासाठी सन २०२१ मध्ये मुहूर्त सापडला आहे.