By Anant Nalawade

Twitter: @nalavadeanant

मुंबई: महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी तब्बल 27 वर्षे स्वराज्याचा कारभार राजगडावरुन चालवला. किल्ले राजगड हा स्वराज्याची पहिली राजधानी, स्वराज्य स्थापनेतील अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. राजगडाचं ऐतिहासिक महत्वं, वेल्हे आणि महाराष्ट्रवासियांच्या मनातलं राजगडाबद्दलचं आदराचं स्थान लक्षात घेऊन पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नामांतर ‘राजगड’ करण्यात यावे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

अजित पवार यांनी यासंदर्भात महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र लिहिले असून, वेल्हे तालुक्याचे नामांतर राजगड करण्यात यावे, अशी आग्रही मागणी केली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या 22 नोव्हेबर 2021 रोजीच्या सर्वसाधारण सभेत वेल्हे तालुक्याचे नामांतर राजगड करण्याबाबत सकारात्मक ठराव झाला आहे. त्यावेळी वेल्हे तालुक्यातील 70 पैकी 58 ग्रामपंचायतींनी, तालुक्याचे नामांतर राजगड करण्याचे ठराव सादर केले होते. किल्ले राजगडाबद्दल वेल्हे तालुकावासियांच्या, तमाम महाराष्ट्रवासियांच्या मनात असलेली आदर, अभिमानाची भावना लक्षात घेऊन वेल्हे तालुक्याचे नामांतर तातडीने करण्यात यावे, अशी मागणी पवार यांनी केली आहे.

वेल्हे तालुक्यामध्ये स्थित असलेल्या राजगड या किल्ल्याशी तालुक्यामधील तमाम नागरिकांचे जिव्हाळयाचे संबध असून हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रथम राजधानी असल्याने या ठिकाणावरुन छत्रपती शिवाजी महाराज यांनी 27 वर्षे शासन चालविले होते.

वेल्हे तालुका हा शिवकालीन व ऐतिहासिक वारसा असलेला आणि किल्ले मालिकेतील किल्ले राजगड व किल्ले तोरणा असे दोन महत्वपूर्ण किल्ले समाविष्ट असलेला तालुका आहे. या तालुक्याचे जुने दस्त पाहता किल्ले तोरणाचे नाव प्रचंडगड या नावाने तालुक्याची ओळख होती. तथापी, तालुक्याचे मुख्य ठिकाण हे वेल्हे बु. घेरा या ठिकाणी असल्याने तालुक्याचे नाव वेल्हे असे नमूद आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here