@maharashtracity

महाड (रायगड): पावसाळ्याच्या पहिल्या आठवड्यातच रायगड (Raigad) जिल्ह्यातील महाड औद्योगिक क्षेत्रातील (Mahad MIDC) रस्त्यांना खड्डे पडल्याने हे रस्ते वाहतुकीस धोकादायक बनले आहेत. ऐन पावसाळ्यात रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली रानटी रोपे देखील तशीच आहेत. त्यातच गटार सफाई न झाल्याने महाड औद्योगिक वसाहतीमधील सर्व रस्त्यांवर गटारातील पाणी तुंबून राहत आहे. वारंवार ये-जा करणारी अवजड वाहने यावरून जात असल्याने खड्ड्यांचा आकार देखील वाढला असून यातून वाहन चालवताना चालकांना कसरत करावी लागत आहे.

महाड एम.आय.डी.सी.मधील रस्त्यांवर कायम रासायनिक कंपन्याचा (chemical factory) माल घेवून येणाऱ्या अवजड वाहनांची संख्या अधिक आहे. शिवाय नागरिकांची वाहने, प्रवासी वाहतूक करणारी वाहने यांची देखील वर्दळ असते.

नांगलवाडी ते बिरवाडी हा रस्ता महाड औद्यागिक विकास महामंडळ यांच्या ताब्यात आहे. देखभाल दुरुस्तीवर प्रतिवर्षी यावर लाखो रुपये खर्च होतो. मात्र या पावसाळ्यात या रस्त्यांवर एक वीत आत जाईल असे खड्डे पडले आहेत. याठिकाणी असलेल्या कारखान्यांचा माल घेवून येणारी वाहने हि कित्येक टन वजनाची असतात. या क्षमतेचा रस्ता मात्र बनवलेला नाही. यामुळे या रस्त्यावर आता खड्डेच खड्डे पडले आहेत. 

सन २०१६ -१७ मध्ये महाड औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यावर सुमारे १ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. तर सन २०१७ -१८ मध्ये देखील जवळपास ८० लक्ष इतका खर्च केला आहे. अंतर्गत रस्ते दुरुस्ती आणि इतर कामे जैसे थे ठेवून ठेकेदार पैसे उकळतात. मातीने भरले जाणारे खड्डे अवजड वाहनाच्या वजनाने कांही तासातच जैसे थे स्थितीत येतात.

आपटे ऑरगॅनिकच्या समोरील आणि मागील बाजूस असलेला रस्ता पूर्ण बाद झाला आहे. त्याचप्रमाणे प्रिव्ही ऑरगॅनिकच्या मागील बाजूस देखील एक मोरी तुटली आहे. यामुळे मोरीचे पाणी भर रस्त्यात आले आहे. प्रिव्ही ऑरगॅनिकच्या समोरील बाजूस तर मोठा खड्डा पडला आहे. हीच अवस्था टेमघर फाटा ते श्रीहरी केमिकल पर्यंत झाली आहे. कोप्राण पासून पुढे गेल्यावर एक्वा फार्म पर्यंत देखील रस्त्यात मोठे खड्डे पडले आहेत.

महाड आसनपोई ते बिरवाडी हा मार्ग देखील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यात असून या मार्गाची देखील सध्या बिकट अवस्था झाली आहे. आसनपोई गावाजवळ एक मोरी खचली असून पुढील भागात किनारा, ते बिरवाडी या दरम्यान रस्त्याला मोठे खड्डे पडले आहेत. 

बिरवाडी जवळ ढालकाठी हे आमदार भरतशेठ गोगावले (Shiv Sena MLA Bharatsheth Gogawale) यांचे निवासस्थान असलेले गाव आहे. यामुळे बिरवाडी मधील रस्ते तरी सुस्थितीत असणे आवश्यक होते. मात्र ऐन पावसाळ्यात या मार्गावर प्रचंड खड्डे पडल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. आधीच अरुंद असलेल्या या मार्गावर कायम वाहनांची गर्दी असते यामुळे बिरवाडी परिसरातील आणि औद्योगिक क्षेत्रातील कामगारांची कायम वर्दळ या मार्गावरून असते. या सर्वाना या खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे.

एम.आय.डी.सी.च्या रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेली रोपे तशीच आहेत. गटार सफाईचे देखील तीनतेरा वाजले आहेत. हि गटारे मातीने भरली गेली आहेत. शिवाय यातील पाणी देखील तसेच साचून आहे. कांही ठिकाणी हे पाणी रस्त्यावर साचून राहत आहे. गटार सफाई, रानटी उगवलेली रोपे काढणे, खड्डे भरणे इत्यादी कामासाठी ठेकेदार नेमला असताना त्यांना दिला जाणारा पैसा जातो कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here