By Sadanand Khopkar
Twitter: @maharashtracity
मुंबई: महाराष्ट्रातील विभिन्न विद्यापीठात पीएच.डी साठी पुरेशा संख्येने गाईड उपलब्ध नसल्याने पीएच.डी. पात्रता प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी संशोधन प्रबंध पूर्ण करण्यापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे पीएच.डी. साठी गाईड नोंदणीचे नियम शिथिल करा आणि गाईड उपलब्ध करुन द्या, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय कार्यसमिती सदस्य विवेकानंद उजळंबकर यांनी केली आहे.
यासंदर्भात विवेकानंद उजळंबकर यांनी महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांचे या गंभीर विषयाकडे लक्ष वेधले.
विवेकानंद उजळंबकर यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील विभिन्न विद्यापीठात पी.एच.डी. पात्रता प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १२,८४३ अशी आहे. राज्यातील अनेक विद्यापीठात पीएच.डी साठी गाईड उपलब्ध नसल्याने हे उत्तीर्ण विदयार्थी संशोधन प्रबंध पूर्ण करण्यापासून वंचित राहत आहेत.
हा विषय दिवसेंदिवस जटील होतो आहे. या विद्यार्थ्यांची मुदत ३१ डिसेंबर २०२३ रोजी संपेल. त्यानंतर पीएच डी करण्यासाठी या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा पात्रता प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. त्यामुळे या प्रश्नावर तातडीने मार्ग काढणे गरजेचे आहे.
याचसाठी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले आणि गाईडची संख्या वाढवा अशी लेखी मागणी केल्याचे विवेकानंद उजळंबकर यांनी सांगितले.
याच पत्राचा आधार घेऊन नागपूरच्या काऊन्सिल फॉर प्रोटेक्शन ऑफ राईट्सचे अध्यक्ष बॅरिस्टर विनोद तिवारी यांनी राज्यपाल तघ कुलपती रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ईमेल द्वारे पत्र पाठवून या गंभीर प्रश्नावर तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे.