@maharashtracity

घंटागाडी नसल्याने नागरिकांचा संताप

परिसर कचरामुक्त करण्याची मागणी

धुळे: माधवपूरा, गल्ली क्रमांक सहामध्ये गेल्या महिनाभरापासून कचरा उचलण्यासाठी घंटागाड्याच न आल्याने परिसरात कचर्‍यांचा ढिग लागला. यामुळे परिसरातील संतप्त नागरिक गुरुवारी कचरा घेऊन थेट महापालिका (DMC) आयुक्तांच्या दालनात पाहोचले. यावेळी नागरिकरांनी आमचा परिसर कचरामुक्त करा, अशी मागणी केली.

भविष्यात पुन्हा कचर्‍यांची (Garbage) समस्या उद्भवली तर मनपाला कचरा भेट देऊन, असा आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी मनपा प्रशासनाला दिला.

माधवपूरा परिसरातील उमेश चौधरी यांच्यासोबत भुषण जाधव, अमित चौधरी यांच्यासह रहिवाशांनी गुरुवारी घरातील कचर्‍याने भरलेल्या कचरा पेट्या आयुक्त अजीज शेख दालनात आणून निषेध व्यक्त केला.

यावेळी परिसरातील नागरिकांच्यावतीने उमेश चौधरी यांनी आयुक्त अजीज शेख यांच्याशी चर्चा केली. माधवपूरा, गल्ली क्रमांक सहा, सात, चैनीरोड या भागात गेल्या दोन महिन्यापासून घंटागाड्या येतच नाहीत. आयुक्तांसह स्वच्छता निरीक्षकांना वारंवार कळवूनही कचरा संकलनाची समस्या सुटली नाही.

“आमच्या परिसरात भाजीबाजार भरतो. त्यामुळे दररोज रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. घरातील कचरापेटी देखील ओसांडून वाहत आहेत. स्वच्छता कर्मचार्‍यांचे दोन महिन्यांपासून पगार थकल्याने ते काम करत नसल्याचे आम्हाला सांगितले गेले. टनोगनती तयार झालेला कचरा ही महापालिकेची मालमत्ता आहे. त्यामुळे त्यांना त्यांची मालमत्ता असलेला कचरा देण्यासाठी येथे आलो आहोत,” अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

शहरात डेग्युने थैंमान घातले आहे. प्रत्येक रुग्णालयात डेेंग्यूचे रुग्ण उपाचार घेत आहेत. त्यात कचरा साचल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचत आहे. महापालिकेने लोकांच्या जिवाशी खेळ चालविला आहे. सफाई कामगारांचे दोन-दोन पगार होत नाही. दुसरीकडे मात्र लाखोंच्या निवीदा निघत आहेत. असा भोंगळ कारभार मनपात सुरु आहे. यामुळे आमचा परिसर तातडीने कचरामुक्त करावा. अन्यथा आम्हाला आंदोलन करायला भाग पाडू नका, असा इशाराही चौधरी यांनी दिला.

आयुक्तांच्या दालनात कचरा घेऊन पोहोचल्यानंतर असे कळले की, दोन महिन्यापासून सफाई कामगारांचा पगार न झाल्याने घंटागाड्या कचरा संकलनासाठी जात नाहीत.

याबाबत आयुक्त शेख यांनी सहाय्यक आरोग्याधिकार्‍यांची चांगलीच कानउघाडणी करुन नागरिकांना वेठीस धरणे योग्य नसल्याचे सुनावले. तातडीने नागरिकांच्या कचरा संकलनाची समस्या सोडविण्याचे आदेशही आयुक्त अजीज शेख यांनी यावेळी अधिकार्‍यांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here