निजामपूरात चमकणारी मेणबत्ती बनविण्याच्या कारखान्याला आग

Twitter : @maharashtracity

धुळे: साक्री तालुक्यातील निजामपूर परिसरातील चिखलीपाडा येथे चमकणारी मेणबत्ती (sparkle candle) बनविण्याच्या कारखान्याला आग लागून चार महिलांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी घडली. शिवाय, एका महिलेसह एक मुलगीही या आगीत गंभीररित्या भाजली आहे. त्यांना नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

निजामपूर परिसरातील चिखलीपाडा या भागात 25 बाय 25 च्या एका खोलीत चमकणारी मेणबत्ती (स्पार्कल कॅण्डल) बनविण्याचा कारखाना सुरु आहे. त्या ठिकाणी साक्री तालुक्यातील जैताणे गावातील महिला कामगार कामाला आहेत. मंगळवारी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास त्या कारखान्यात शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. या आगीची ठिणगी चमकणारी मेणबत्ती (स्पार्कल कॅण्डल) बनविण्याच्या कच्चा मालावर पडली. यामुळे ही आग आणखी भडकली. 

आगीत त्या ठिकाणी काम करणार्‍या आशाबाई भैय्या भागवत (वय 34), पुनम भैय्या भागवत (वय 16), नैनाबाई संजय माळी (वय 48), सिंधूबाई धुडकू राजपूत (वय 55) सर्व रा. जैताणे ता. साक्री या चार जणींचा होरपळून मृत्यू झाला. तर संगीता प्रमोद चव्हाण (वय 55) ही 70 टक्के व निकीता सुरेश महाजन (वय 18) ही 30 टक्के भाजली. या दोघींना उपचारासाठी नंदुरबार येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

चमकणारी मेणबत्ती (स्पार्कल कॅण्डल) बनविण्याचा हा कारखाना रोहीणी कुवर रा. पुणे यांचा असून, या कारखान्याचा कारभार जगन्नाथ रघुनाथ कुवर रा. वासखेडी ता. साक्री हे पाहत असल्याने त्यांना ताब्यात घेत चौकशी सुरु केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिवाय, हा कारखाना चालविण्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या कुवर यांनी घेतल्या होत्या का? या कारखान्यात कुणी बालकामगार काम करीत होते का? याचीही चौकशी पोलिस करीत आहे.

“चिखलीपाडा येथील चमकणारी मेणबत्ती (स्पार्कल कॅण्डल) बनविण्याच्या कारखान्याला आग लागून एकूण चार महिलांचा होरपळून मृत्यू झाला असून अन्य दोन महिला गंभीररित्या भाजल्या आहेत. ही आग नेमकी शॉटसक्रीटमुळे लागली की तेथील ज्वलनशील पदार्थामुळे लागली, याचा तपास सुरु केला आहे. या घटनेच्या चौकशीसाठी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.”

– संजय बारकुंड,

पोलीस अधीक्षक, धुळे जिल्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here