Twitter: @maharashtracity

धुळे: धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित एक दिवसीय विंटर ट्रॉफी टूर्नामेंटचा अंतिम सामना चावरा क्रिकेट अकॅडमी व शिरपूर तालुका क्रिकेट असोसिएशन दरम्यान खेळविण्यात आला. चावरा क्रिकेट अकॅडमीने शिरपूर तालुका क्रिकेट असोसिएशन विरोधातील हा अत्यंत चुरशीचा सामना 7 धावांनी जिंकून ट्रॉफी वर आपले नाव कोरले.

या स्पर्धेत एकूण वीस संघानी सहभाग नोंदविला. ही स्पर्धा लीग पद्धतीने खेळविण्यात आली. अंतिम सामन्यात चावरा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चावरा संघाने 40 षटकात सर्व गडी बाद 175 धावा केल्या. चावरा संघातर्फे मनीष बोरसे 20 धावा, हितेश खताळ 28 धावा, प्रतीक शिंदे 28 धावा व प्रथमेश कुवर 35 धावा केल्या.

शिरपूर संघातर्फे आनंद जगताप 4 गडी, लोकेश देशमुख 3 गडी, मयुरेश पवार 2 गडी व भावेश शर्मा 1गडी बाद केला. प्रत्युत्तरात खेळताना शिरपूर संघाने 43 षटकात सर्व गडी बाद 168 धावा केल्या. शिरपूर संघातर्फे आनंद जगताप याने एकाकी झुंज देत 83 धावा केल्या. प्रशांत ढोले याने 19 तर तर ऋषी पंजाबी याने 16 धावा केल्या. चावरा क्रिकेट अकॅडमीने हा अत्यंत चुरशीचा सामना 7 धावांनी जिंकला.

विजयी चावरा क्रिकेट अकॅडमी संघास चषक व 11 हजार रुपये रोख तर उपविजयी शिरपूर संघास चषक व 7 हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात आले. अंतिम सामन्यानंतर लगेचच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. उत्कृष्ट फलंदाज म्हणून प्रशांत ढोले, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून मृदुल शिंदे, उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून ऋषी पंजाबी तर मालिकावीराचा पुरस्कार प्रतीक शिंदे यास देण्यात आला. तसेच अंतिम सामन्याच्या सामनावीराचा पुरस्कार देखील प्रतीक शिंदे यास देण्यात आला.

यावेळी धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष लहू पाटील, उपाध्यक्ष विक्रम राठोड, सचिव संदीप शिंदे, सहसचिव संदीप लिंगायत, सदस्य ॲडव्होकेट कुंदन पवार व सदस्य विजय पंजाबी उपस्थित होते. अंतिम सामन्यात पंच म्हणून कैलास पाटील व अनिल वाडेकर यांनी तर गुणलेखक म्हणून विजय अग्रवाल यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here