@maharashtracity

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेला विजयी करा – डॉ नीलम गोऱ्हे

धुळे – आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आपसातील मतभेद, हेवेदावे विसरुन एकत्र येवून शिवसेनेला (Shiv Sena) विजयी करा आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे हात बळकट करावे, असे आवाहन शिवसेनेच्या नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे (Dr Neelam Gorhe) यांनी धुळ्यात केले. धुळे महापालिकेत सत्तेवर असलेल्या भाजपला टोला लगावतांना, पालिकेने केलेले रस्ते काम शोधण्यासाठी शिवसैनिकांनाच गुप्तहेर व्हावे लागेल लागेल, अशी टीका केली.

धुळे (Dhule) जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावांचा आढावा, तसेच युवा सेनेच्या जिल्हा मेळाव्याच्या निमित्ताने धुळे दौर्‍यावर आलेल्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी शहरातील कमलाबाई कन्या शाळेच्या सभागृहात युवासेनेचा संवाद मेळाव्यात मार्गदर्शन केले.

या वेळी कृषीमंत्री दादा भुसे (Agriculture minister Dada Bhuse), युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई (Yuva Sena secretary Varun Sardesai), आमदार मंजुळा गावित, शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबन थोरात, जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, हेमंत साळुंके, रूपेश कदम, योगेश निमसे, विस्तारक अमित पाटील आदी उपस्थित होते.

शिवसैनिक, युवासैनिकांनी पदासाठी नाही तर जनतेसाठी काम करावे. योग्य वेळेला योग्य संधी प्रत्येकाला मिळेल. कामाची पावती जनता देते, असे प्रतिपादन उपसभापती नीलम गोर्‍हे (Dr Neelam Gorhe) यांनी यावेळी केले.

मेळाव्यात ऍड. नीलम गोर्‍हे पुढे म्हणाल्या की, पूर्वी अधिकारी काम करत नसतील तर शिवसैनिक वर्दी उतरवण्याची धमक ठेवत होते. आता आपण सत्तेत आहोत. जर एखादा अधिकारी गैरवर्तन करत असेल तर अशा अधिकार्‍याविरोधात शिवसैनिकांनी आमदार, खासदारांना निवेदन द्या. त्या अधिकार्‍याला लोकप्रतिनिधी विधानसभेत जाब विचारतील.

“धुळे पालिकेने ज्या रस्त्यांचे काम केले ते रस्तेच हरवले आहे. हे रस्ते शोधण्यासाठी आता गुप्तहेर लागतील का काय असा प्रश्न आहे. आता शिवसैनिक, युवासैनिकांनी गुप्तहेर होत चुकीच्या कामांचा जाब विचारावा,” असेही त्या म्हणाल्या.

मंत्री दादा भुसे म्हणाले की, आघाडीच्या सरकारमध्ये पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे काम प्रेरणादायी आहे. तरुणांनी त्यांचा आदर्श घ्यावा. वरुण सरदेसाई म्हणाले की, विद्यार्थी, तरुणांच्या प्रश्नासाठी नेहमीच आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. भविष्यात हा पवित्रा कायम असेल. जोपर्यंत हातात सत्ता नसेल तोपर्यंत काही करता येत नाही. त्यासाठी प्रत्येक विद्यापीठाच्या सिनेटमध्ये आपले सदस्य असणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

युवासेनेचे जिल्हाप्रमुख ऍड. पंकज गोरे यांनी प्रास्ताविक केले. धनंजय दीक्षित यांनी सूत्रसंचालन केले.

महिलांसाठी उपसमिती नेमण्याचे सुचना

मेळाव्यापुर्वी उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी दुपारी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनामुक्त गावांसह विविध विभागांची सविस्तर आढावा बैठक घेतली. कोरोनामुळे एक किंवा दोन पालक गमावलेल्या मुलांच्या पुनर्वसनासाठी शासनाच्या सूचनेनुसार जिल्हास्तरीय कृती दल गठीत झाले आहे. त्याअंतर्गत उपसमिती गठीत करून कोरोनामुळे एकाकी पडलेल्या धुळे जिल्ह्यातील महिलांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करावे, अशी सुचना डॉ. गोर्‍हे यांनी केली. महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस दलाने महिला दक्षता समित्यांची पुनर्रचना करावी, असेही त्या म्हणाल्या.

जिल्हाधिकारी जलत शर्मा यांनी सांगितले की जिल्ह्यात आतापर्यंत १२२ गावांनी कोरोना विषाणूचा शिरकाव होऊ दिला नाही. जिल्ह्यात केवळ ४ रुग्ण सक्रीय असून ते साक्री तालुक्यातील आहेत.

आढावा बैठकी नंतर डॉ नीलम गोर्र्‍हे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. या वेळी डॉ. गोर्‍हे यांनी सांगितले की, धुळे जिल्ह्यात कोरोना संकट काळात चांगले काम झाले आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांनी केलेल्या सूचनेनुसार कोरोनामुक्त झालेल्या गावांमधील नागरिकांच्या शरीरातील अँटिबॉडीज तपासणी करण्यात येईल. याविषयी जिल्हाधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात मंजूर झालेल्या ऑक्सिजन प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करावे, प्रकल्पाचे काम का रखडले आहे याची माहिती घेण्यात येईल. आई आणि वडील गमावलेल्या पाल्यांकडे बँकेच्या थकीत कर्जासाठी तगादा सुरू आहे. बँकिंग धोरण हे केंद्राशी संबंधित आहे. याबाबत केंद्राकडे देखील पाठपुरावा करत ज्या अल्पवयीन मुलांचे आई आणि वडील दोन्ही दगावले आहेत. त्यांना बँकेच्या कर्जातून काही सूट मिळते का यासाठी प्रयत्न होतील, असेही गोर्‍हे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here