By Anant Nalavade
Twitter : @nalavadeanant
मुंबई: ‘ने मजसी ने मातृभूमीला’ आणि ‘जयस्तुते जयस्तुते’ या सावरकरांच्या कविता अभ्यासक्रमात आल्या पाहिजेत, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी सोमवारी येथे केले. तसेच सावरकारांना नाकारणे म्हणजे सर्व स्वातंत्र्य सैनिक आणि जवानांचे बलिदान नाकारणे आहे, अशा शब्दात बैस यांनी काँग्रेसचे नाव न घेता टीका केली.
राज्यपाल बैस यांच्या हस्ते आज स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्काराचे वितरण दादर येथील सावरकर स्मारकात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर नाव न घेता टीका केली. सावरकर एक उत्कृष्ट साहित्यिक होते. त्यांनी पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाचे वर्णन आपल्या पुस्तकातून अधोरेखित केले आहे. मधल्या काळात अनेक क्रांतिकारकांना बदनाम केले गेले, अशी खंतही बैस यांनी व्यक्त केली.
सावरकरांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. सावरकर स्मारकात विद्यार्थी आले पाहिजेत, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. हे स्मारक देशासाठी प्रेरणास्थान बनायला पाहिजे. नाशिकच्या भगूर येथे सावरकरांचे भव्य स्मारक बनवण्याची गरज आहे. येत्या २८ मे रोजी सावकरांची १४० वी जयंती आहे. हा दिवस ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवदिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याच दिवशी देशाच्या नव्या संसदेचे लोकार्पण होणार असल्याची माहितीही राज्यपाल बैस यांनी दिली.
यावेळी हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार’ मरणोपरांत प्रदान करण्यात आला. मेजर राणे यांच्या आई वीरमाता ज्योती राणे यांनी हा पुरस्कार राज्यपालांकडून स्वीकारला. राज्यपालांच्या हस्ते आयआयटी कानपूरचे संचालक डॉ. अभय करंदीकर यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कार’ देण्यात आला. तर नागपूर येथील ‘मैत्री परिवार’ या संस्थेला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर समाजसेवा पुरस्कार’ देण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर विचारांच्या प्रचार आणि प्रसार कार्यासाठी प्रदीप परुळेकर यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती चिन्ह’ पुरस्कार देण्यात आला.