@maharashtracity

मुंबईच्या महापौरांचे पंतप्रधानांना पत्र

मुंबई: कर्नाटक (Karnataka) राज्यातील बेळगाव (Belagavi), कारवार (Karvar), निपाणी (Nipani) आदी ८६५ मराठीबहुल गावे महाराष्ट्रात (Maharashtra) सामील करावीत, अशी मागणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे लिखित पत्राद्वारे केली आहे.

देशात १९५६ मध्ये भाषावार प्रांतरचना करताना ८६५ मराठीबहुल गावे कर्नाटक राज्यात सामील करण्यात आली. त्यामुळे तेथील ४० लाख मराठी भाषिकांची गळचेपी केली जात आहे. त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. मूळ मराठी भाषिक असताना त्यांच्यावर कर्नाटक सरकार जाणीवपुर्वक कानडी भाषा लादत आहे, असा घणाघाती आरोप महापौर किशोरी पेडणेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे.

कर्नाटकमधील या मराठीबहुल ८६५ गावातील मराठी भाषिकांना कायमस्वरूपी महाराष्ट्रात सामील व्हायचे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तेथील मराठी बांधव कर्नाटक सरकारकडून भाषेबाबत होत असलेला अन्याय सहन करीत आहे. या मराठी बांधवांना मारहाण केली जाते. त्यांच्या घरात घुसून तोडफोड केली जाते. त्यांच्या संसाराची राखरांगोळी केली जात आहे.

मराठी भाषिकांवरील या अन्यायाची गंभीर दखल घेऊन महापौर किशोरी पेडणेकर यांनी, आज ९ ऑगस्ट क्रांतीदिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयात लेखी पत्र पाठवून याप्रकरणी हस्तक्षेप करण्यास व कर्नाटकमधील मराठीबहुल ८६५ गावांचा समावेश महाराष्ट्रात करण्याची मागणी केली आहे.

गेल्या ६५ वर्षांपासून कर्नाटकात खितपत पडलेल्या, दुर्लक्षित व पीडित ४० लाख मराठी बांधवांना केंद्र सरकारने दिलासा देणारा निर्णय घ्यावा, अशी मागणी महापौरांनी केली आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांच्या पत्राची दखल पंतप्रधान कार्यालय व खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी कशा प्रकारे घेणार व त्याला सकारात्मक की नकारात्मक उत्तर देणार, याची प्रतिक्षा महापौरांना लागून राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here