@maharashtracity

मुंबई: राज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करण्याचा व परिसंस्थांवर आधारित उपजिविकेलाही प्रोत्साहन देण्यासाठी ग्रीन क्लायमेट फंडच्या सहाय्याने प्रकल्प राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

हा प्रकल्प राज्यातील 4 किनारी जिल्ह्यातील 11 तालुक्यात राबवला जाणार आहे- सिंधुदुर्ग (देवगड, मालवण, वेंगुर्ला), रत्नागिरी (दापोली, गुहागर, राजापूर व रत्नागिरी), रायगड (श्रीवर्धन व अलिबाग) आणि पालघर (पालघर, डहाणू).

राज्यात या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य प्रकल्प सुकाणू समिती कामकाज करेल.
युनायटेड नेशन्स डेव्हल्पमेंट प्रोग्रॅम, ग्रीन क्लायमेट फंड यांच्या आंशिक अर्थ सहाय्यातून महाराष्ट्र, आंध्रप्रदेश व ओदिसा या तीन राज्यात ‘एनहांसिंग क्लायमॅट रेसिलियन्स ऑफ इंडियाज कोस्टल कम्युनिटीज” हा प्रकल्प राबविण्यात येत असून यासाठी ग्रीन क्लायमेट फंड यांनी पर्यावरण, वन आणि जल वायू परिवर्तन मंत्रालय,भारत सरकार यांना कार्यान्वयन यंत्रणा म्हणून तर महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, ओडिसा राज्यांना कार्यान्वयन भागीदार म्हणून घोषित केले आहे.

हा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात आला होता. यात कांदळवन कक्षाच्या माध्यमातून खेकडेपालन, कालवे पालन, सिरी भात शेती शोभिवंत मासेपालन, कांदळवन पर्यटन असे उपजीविकेचे कार्यक्रम हाती घेण्यात आले. या प्रकल्पाचे यश विचारात घेऊन त्याची राष्ट्रीय स्तरावर व्याप्ती वाढवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे ठरले. त्यानुषंगाने हा प्रकल्प सह आर्थिक बांधिलकीव्दारे राज्यात राबविण्यात येईल. या प्रकल्पाचा कालावधी 31 डिसेंबर, 2025 पर्यंत राहील.

प्रकल्प मूल्य आणि राज्याचा हिस्सा
प्रकल्पाचा एकूण मंजूर आराखडा 130.26 दशलक्ष अमेरीकन डॉलर्सचा असून त्यातील ग्रीन क्लायमेट फंडचा हिस्सा 43.41 दशलक्ष डॉलर्स इतका राहणार आहे. महाराष्ट्र शासनास प्रकल्प व्यवस्थापनासाठी 2.11 दशलक्ष डॉलर्स व परिसंस्था पुन:स्थापन व उपजीविका विषयक उपक्रमांसाठी 9.32 दशलक्ष डॉलर्स असे एकूण 11.43 दशलक्ष डॉलर्स इतके अनुदान प्राप्त होणार आहे. राज्य शासनाची सह आर्थिक बांधिलकी 19 दशलक्ष डॉलर्स (रु 140.90 कोटी) इतकी आहे.

प्रकल्पातील उपक्रम

प्रकल्पांतर्गत परिसंस्था पुन: स्थापन व उपजीविका विषयक खालीलप्रमाणे उपक्रम अंशत : सह आर्थिक बांधिलकीतून राबविण्यात येणार आहे –

परिसंस्था पुन: स्थापन

• कांदळवनांचे पुन: स्थापन व पुन:स्थापित कादंळवनांची 3 वर्ष देखभाल
• प्रवाळ परिसंस्थांचे पुन: स्थापन व पुन:स्थापित प्रवाळ परिसंस्थांची 3 वर्ष देखभाल
• अवनत पाणलोट क्षेत्राचे पुन: स्थापन व पुन:स्थापित पाणलोटांची 3 वर्ष देखभाल

उपजीविका विषयक उपक्रम

• कांदळवनातील खेकडेपालन, शिंपले शेती, कालवं शेती, खेकडा उबवणूक केंद्र, शोभिवंत मासेपालन, सी विड फार्मिंग, भातशेतीकरीता SRI (System of Rice Intensification) तंत्र, मासे मूल्यवर्धित उत्पादने, मत्स्य खाद्य उत्पादन घटक, मासे धुरळणी केंद्र, मध उत्पादन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here