@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिका (BMC) शिक्षण विभागामार्फत भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या ५ सप्टेंबर जन्मदिवसा निमित्ताने ‘आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार’ देऊन पात्र शिक्षकांना सन्मानित करण्यात येते.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी गुरुवारी पालिका मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत, मुंबईतील महापालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित व विना अनुदानित प्राथमिक शाळांमधील ५० आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार विजेत्या आदर्श शिक्षकांची यादी जाहीर केली.

या आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारात मराठी शिक्षकांनी व विशेषतः महिला शिक्षकांनी बाजी मारली आहे.

याप्रसंगी, उप महापौर अँड. सुहास वाडकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, स्थापत्य समिती अध्यक्ष (शहर) दत्ता पोंगडे, शिक्षणाधिकारी (प्रभारी) राजू तडवी तसेच सबंधित पालिका अधिकारी उपस्थित होते

सर्वाधिक १९ मराठी शिक्षक

या ५० आदर्श शिक्षकांमध्ये मराठी माध्यमांचे सर्वाधिक म्हणजे १९ शिक्षक, हिंदी व इंग्रजी माध्यमांचे प्रत्येकी ११ शिक्षक, उर्दू माध्यमाचे ७ शिक्षक, गुजराती व कन्नड माध्यमाचे प्रत्येकी १ शिक्षकांचा समावेश आहे.

५० शिक्षकांमध्ये २८ महिला शिक्षक

महापौरांनी आज जाहीर केलेल्या पुरस्कार विजेत्या ५० आदर्श शिक्षकांमध्ये विविध माध्यमांच्या २८ शिक्षकांचा समावेश आहे. त्यामुळे ही बाब पालिका व अनुदानित आणि विना अनुदानित शाळांमधील महिला शिक्षकांच्या दृष्टीने अत्यंत समाधानाची व गौरवास्पद बाब आहे.

शिक्षण विभागातील महापालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा,खासगी अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक शाळांमधील जे शिक्षक ज्ञानदानाचे व विद्यार्थी घडविण्याचे पवित्र कार्य प्रामाणिकपणे करीत आहेत.

त्यांचा यथोचित गौरव करण्याची परंपरा सन-१९७१ पासून २ शिक्षकांना पुरस्कृत करुन सुरु झाली. तदनंतर वेळोवेळी यामध्ये बदल होऊन आजमितीस ५० आदर्श शिक्षकांना “महापौर पुरस्काराने ” गौरविण्यात येते.

महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा,खासगी अनुदानित शाळा व विना अनुदानित प्राथमिक शाळांतील आदर्श आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सतत असिधाराव्रत स्विकारलेल्या ५० शिक्षकांना प्रत्येकी १० हजार रुपये मुंबई महापालिका मानचिन्हाचे सोन्याचा मुलामा दिलेले पदक , प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व फेटा देऊन महापौरांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे.

दिनांक २३ ते २५ ऑगस्ट या कालावधीत निवड समितीने सिटी ऑफ लाँस एंजलिस मनपा शाळा, मनमाला टँकरोड, स्टारसिटी सिनेमा जवळ, माहीम -माटुंगा (पश्चिम), मुंबई येथे १३० शिक्षकांच्या मुलाखती घेऊन त्यातून एकूण ५० शिक्षकांची महापौर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here