@maharashtracity
धुळे: शिरपूर तालुक्यातील भोरखेडा येथील कोरोनामुळे (corona) पालक गमावलेल्या बालकांशी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर (Minister Yashomati Thakur) यांनी संवाद साधला. काही अडचण असेल तर माझ्याशी थेट संपर्क साधावा, असे सांगत यशोमती ठाकूर यांनी त्यांना धीर दिला.
पालक गमावलेल्या बालकांच्या नियमित संपर्कात राहून त्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा, असे निर्देशही त्यांनी अधिकार्यांना दिले.
मंत्री ऍड. ठाकूर शनिवारी धुळे जिल्ह्याच्या दौर्यावर होत्या. शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथे जाण्यापूर्वी त्यांनी शिरपूर तालुक्यातील भोरखेडा येथील कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेले अविनाश राजपूत व रितू राजपूत यांच्या मुलांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.
या वेळी जयेश आणि हर्षवधन यांना मदत करण्याचे आश्वासन मंत्री ऍड. ठाकूर यांनी दिले. तसेच अडचणी असतील तर थेट संपर्क साधावा, असेही त्या म्हणाल्या.
मंत्री ऍड. ठाकूर म्हणाल्या की, ‘कोविड’मुळे अनाथ झालेल्या बालकांचे शिक्षण, पोषण आणि त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. अशा मुलांच्या मदतीसाठी शासन नेहमीच तत्पर आहे. कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांना शिधापत्रिकेसह शासनाचे विविध लाभ मिळवून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी. याविषयाकडे अधिकार्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे.
त्याचबरोबर पालक गमावलेल्या मुलांचे वेळोवेळी समुपदेशन करण्यात यावे. त्यांचे मालमत्तेचे प्रश्न तातडीने सोडवावेत. मंत्री ऍड. ठाकूर यांनी राजपूत भावंडांशी संवाद साधला. या वेळी ग्रामस्थ उपस्थित होते.