आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची लेखी मागणी

Twitter : @maharashtracity

वैश्विक महामारी ठरलेल्या कोविड – १९ च्या काळात सबंध महाराष्ट्रात अनेक विद्यार्थ्यांचे वडील / पालक मृत्युमुखी पडले. त्यांच्या मुला-मुलींना कोणत्याही प्रकारचा आधार राहिला नसल्याने त्यांना आरटीई (RTE) अंतर्गत मोफत शिक्षण योजनेचा लाभ द्यावा, अशी लेखी मागणी आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री शिंदे यांनी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना ही विनंती मान्य करण्याच्या लेखी सूचना दिल्या आहेत. आरटीई प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने असल्याने यंदाच्या वर्षाची प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढील वर्षी या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळू शकेल.

कोरोना महामारीच्या काळात घरातील कमावत्या व्यक्तीचे दुर्दैवी मृत्यू झाल्याने एकल विधवा निराधार महिलेला त्यांच्या निराधार मुलांना चांगले शिक्षण देण्याची इच्छा असतांनाही आर्थिक दृष्ट्या परवडणारे नसल्याने अशा विद्यार्थ्यांना नाईलाजाने शाळेतुन निघावे लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे आमदार डॉ.किणीकर यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.

राज्यातील ज्या विद्यार्थ्यांचे वडिल / पालक कोविड -१९ महामारीत मरण पावले आहेत. त्या पालकांच्या मुलांना पहिली ते दहावीपर्यंतच्या कोणत्याही वर्गात असलेल्या मुलांना त्याच शाळेत त्याच वर्गात किंवा त्यांच्या घराच्या जवळील चांगल्या शाळेमध्ये आरटीई योजनेअंतर्गत शिक्षणाचा लाभ मिळाल्यास त्यांचा शिक्षणाचा प्रश्न मिटू शकतो असे देखील आमदार डॉ. किणीकर यांनी निवेदनात म्हटले आहे. यापूर्वी शिक्षणाधिकारी यांनी अशा विद्यार्थ्यांच्या संदर्भात सर्व्हे करून त्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयांकडे सुपूर्द केली आहे. परंतु, अद्यापपर्यंत या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न मिटू शकलेला नाही. मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या या सकारात्मक प्रतिसादामुळे या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या दिलासा मिळणार असल्याची भावना आमदार डॉ.किणीकर यांनी यावेळी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here