@maharashtracity

एमआयएम आमदार ठेकेदारकडून पैसे मागतात – भाजपचा दावा

धुळे: शहरातील कचरा समस्येवर विरोधकांनी आक्रमक होत आज धुळे महापालिकेच्या (DMC) महासभेत थेट सभागृहातच कचरा टाकून सत्ताधारी भाजपला (BJP) धारेवर धरले. यावेळी ‘धुळे शहर कचरामुक्त करा’ असे बॅनर झळकावण्यात आले.

भाजपचे नगरसेवक सुध्दा या आंदोलनामुळे संतप्त झाले. विरोधकांना सडेतोड उत्तर देत ते समोर आल्याने एकच खंडाजंगी झाली. त्यात प्रभारी महापौर भगवान गवळी यांनी हस्तक्षेप केला. शहरातील कचरा संकलनाचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी तत्काळ नवीन ठेकेदार नेमण्यासाठी झालेल्या निविदा प्रक्रियेनुसार मंजूरी दिलेल्या ठेकेदाराला ५ दिवसात वर्क ऑर्डर द्यावी, असे आदेश गवळी यांनी प्रशासनाला दिले.

धुळे महापालिकेची सर्वसाधारण महासभा आज सकाळी मनपा सभागृहात प्रभारी महापौर भगवान गवळी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. महासभेच्या अंजेड्यावर नामांतरासह कचरा संकलन आणि मनपा प्रशासनातील अधिकार्‍यांच्या पदोन्नतीचे विषय होते.

सुरुवातीलाच विरोधी पक्ष नेते कमलेश देवरे, नगरसेवक उमेर अन्सारी, कॉंग्रेसचे साबीर खान भंगारवाले, समाजवादी पक्षाचे अमिन पटेल तसेच एम आय एम पक्षाच्या नगरसेवकांनी हातात शहर कचरा मुक्त करा अशी मागणी असलेला फलक आणि सोबत एका खोक्यात आणलेला कचरा घेवून सभागृहात प्रवेश केला. त्यांनी थेट महापौरांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत घोषणाबाजी करीत खोक्यातील कचरा ओतला. यामुळे एकच खळबळ उडाली.

विरोधकांच्या या कृत्यावर सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनीदेखील आक्रमक होत प्रतिउत्तर दिले. कमलेश देवरे, साबीर खान आदींचा शितल नवले, हिरामण गवळी, प्रतिभा चौधरी, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांच्यात जोरदार शाब्दीक वाद झाला.

यावेळी विरोधी पक्ष नेते कमलेश देवरे यांनी शहरात ठिकठिकाणी कचरा साचला आहे. नविन ठेकेदाराला कार्यादेश का दिला जात नाही? प्रशासनाचा धिक्कार असून प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे शहरात कचरा, अस्वच्छता पसरली असून लोकांना विविध साथीचे आजार होत आहेत, लोकांचे हाल होत असून नगरसेवकांची आपल्या प्रभागात मोठी बदनामी करण्याचे काम प्रशासनाकडून केले जात असल्याचा आरोप केला.

भाजपाचे जेष्ठ नगरसेवक हिरामण गवळी यांनी नवीन कचरा संकलनाचा ठेका देण्याची प्रक्रिया पुर्ण झाली आहे. मात्र शहराचे एम आय एम पक्षाचे आमदार (MIM MLA) यांनी ठेकेदाराकडून पैसे मिळावे यासाठी सरकारकडे तक्रारी करुन ठेकेदार नेमण्याच्या प्रक्रीयेत हस्तक्षेप केला आहे. त्यामुळेच आज हा प्रश्‍न निर्माण झाला असल्याचा आरोप करीत एम आय एम पक्षाच्या नगरसेवकांनी आंदोनल न करता याबद्दल आमदारांना जाब विचारावा अशी टिका केली.

भाजपाचे शितल नवले यांनी सुध्दा आमदार फारुक शाह यांच्यावर टिका केली. आमदारांच्या तक्रारीनंतर काही पत्र शासनाकडून आले असतील तर प्रशासनाने त्याची माहिती सभागृहात द्यावी, उगाच वेळकाढूपणा करु नये, लोकांची कामे होत नाहीत आणि बिले मात्र काढली जातात यावर प्रशासनाला धारेवर धरले.

नगरसेवक उमेर अन्सारी, संजय भिल यांनी देखील कचरा, पाणी पुरवठा विविध मुद्यांवर टिकेची झोड उठवली. माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांनी प्रभागात स्वच्छतेची कामे होत नसल्याबद्दल प्रशासनाला जाब विचारला. मनपाचे स्वच्छता निरीक्षक काम करण्यास येतात. मात्र, त्यांना कर्मचारी मिळत नाहीत, ठेकेदाराकडून कचरा उचलला जात नाही. मनपाकडून यावर कारवाई होणार नसेल तर स्वतः कचरा उचलायचा का असा जाब विचारला.

विरोधक आणि सत्ताधारी नगरसेवकांच्या भावना ऐकुन प्रभारी महापौर भगवान गवळी यांनी प्रशासनाला कचरा संकलनाचा ठेका त्वरीत देण्याची तसेच ५ दिवसात वर्क ऑर्डर देवून शहरात प्रत्येक प्रभागात घंटागाड्या पुन्हा नियमित सुरु होईल असे नियोजन करण्याचे आदेश दिले. महासभा दुपारी उशिरा पर्यंत सुरु होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here