मुंबई: रायगड, कोंकण, सांगली, सातारा आदी भागात महापूर, दरड कोसळणे आदी नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे. त्यामुळे मोठी जीवित व वित्तीय हानी झाली आहे. तेथील पुरग्रस्तांचा संसार उध्वस्त झाला आहे. कोरोनामुळे अगोदरच आर्थिक फटका बसलेला असताना हे आस्मानी संकट कोसळल्याने तेथील पीडित कोलमडून गेले आहेत. त्यांना सध्या मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे. सरकारी मदत पोहचेपर्यन्त उशीर होतो.
ही बाब पाहता मुंबई महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांनी त्यांचे एक महिन्याचे मानधन चिपळूण येथील पुरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतला आहे. हा मदतनिधी तातडीने पुरग्रस्तांच्या साहाय्यासाठी वापरण्यात यावा, अशी विंनती भाजपतर्फे महापौर किशोरी पेडणेकर यांना करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त भागात नुकताच पाहणी दौरा केला. त्यावेळी एका पूरग्रस्त महिलेने पोटतिडिकीने आक्रोश करत खासदार, आमदारांचे वेतन पूरग्रस्तांसाठी देण्याचे आवाहन केले होते. त्याची दखल घेऊन मुंबई महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांनी आपले एक महिन्याचे मानधन पूरग्रस्त निधीस वर्ग करण्याचा निर्णय घेतला असल्याचे भाजपचे पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यांनी याबाबतचे एक लेखी पत्र महापौर किशोरी पेडणेकर आणि महापालिका चिटणीस संगीता शर्मा यांना पाठवले आहे.
राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळून मोठे नुकसान झाले आहे. त्यात मोठी जीवित व वित्तहानी झाली आहे. महाराष्ट्रात कोकण, विदर्भ, अमरावती, सांगली इत्यादी ठिकाणी कित्येक दिवस पावसाचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाले. अनेक हातावर पोट असणाऱ्या कुटुंबीयांचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त झाले आहे.
अशा प्रसंगी आपत्तीग्रस्त कुटूंबियांना उभा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची गरज आहे. पूरग्रस्त भागातील सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात मदतीच्या अपेक्षेने सरकारकडे पाहत आहेत. राज्यात कुठेही आपत्ती उद्भवल्यास भाजपतर्फे पुनर्वसनासाठी तातडीने मदत पोहोचवण्यात येते.
या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन पूरग्रस्त निधीस देण्याचा निर्णय तातडीने घेण्यात आला आहे, अशी माहिती भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली.
भाजपचे सध्या ८३ नगरसेवक असून प्रत्येकी २६ हजार रुपये प्रमाणे जवळजवळ २१ लाख ५८ हजार रुपये इतका निधी पूरग्रस्तांना मदतीसाठी सहाय्यभूत ठरणार आहे, असे भाजपचे प्रवक्ते व स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी सांगितले.