पिडित महिलांना मदतशीर ठरतेय वन स्टॉप सेंटर योजना
Twitter : @maharashtracity
मुंबई: पिडित महिलांसाठी वैद्यकीय, कायदेशीर सुविधा देण्याच्या उद्देशाने राज्यात जिल्हानिहाय ’वन स्टॉप सेंटर‘ योजना सुरू करण्यात आली. या केंद्राचा विस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून आता मुंबई उपनगर, औरंगाबाद, नाशिक, नागपुर व ठाणे या शहरांमध्ये एक अशी मिळून पाच अतिरिक्त ’वन स्टॉप सेंटर्स‘ सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे या केंद्रांची संख्या ३७ वरून ४२ इतकी होणार आहे.
केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने डिसेंबर २०१७ रोजी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक, तर पुणे जिल्ह्यासाठी २ असे ३७ ’वन स्टॉप सेंटर्स‘ सुरू केले. तर शहरी भागामधील वाढती लोकसंख्या त्याचबरोबर महिलांवर वाढते अत्याचार, हिंसा या बाबी लक्षात घेता राज्यातील मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असलेल्या मुंबई उपनगर, औरंगाबाद, नाशिक, नागपुर व ठाणे या शहरांसाठी प्रत्येकी एक अशी पाच अतिरिक्त ’वन स्टॉप सेंटर्स‘ सुरु करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. त्यामुळे राज्यातील ’वन स्टॉप सेंटर्स‘ संख्या आता ३७ वरून ४२ इतकी होणार आहे. मानसिक छळ किंवा इतर कोणत्याही संकटग्रस्त महिलांना मदत करण्यासाठी संस्थात्मक, मनोसामाजिक, कायदेशीर समुपदेशकांमार्फत सहाय्य करता यावे, म्हणून ’वन स्टॉप सेंटर्स‘ वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा शहरी भागातील महिलांना अधिक लाभ होणार आहे. केंद्र शासनाच्या ’मिशन शक्ती‘ या योजनेच्या ’संबल’ या उपयोजनेतील ’वन स्टॉप सेंटर‘ या घटक योजनेसाठी केंद्र शासनाचा १०० टक्के हिस्सा असणार आहे.