@maharashtracity

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी (RTPCR test) आता फक्त ३५० रुपये आकारण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सोमवारी दिली.

राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर सुधारित करण्याची ही सहावी वेळ असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चाचण्यांच्या दरात सुधारणा केली आहे. आता नव्या सुधारित दरानुसार केवळ ३५० रुपयांत चाचणी करणे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक असल्याचे टोपे यांनी सांगितले.

कोरोना निदान चाचणी नवीन निर्णयानुसार संकलन केंद्रावरुन नमूना घेवून त्याची वाहतूक आणि अहवाल देणे या सर्व बाबींसाठी रुग्णाकडून ३५० रुपये आकारले जातील. तर रुग्णालय (hospital), कोविड केअर सेंटर (covid care center), क्वारंटाईन सेंटरमधील प्रयोगशाळा येथून नमूना तपासणी आणि अहवाल यासाठी ५०० रुपये आकारण्यात येणार आहेत.

तसेच रुग्णाच्या निवासस्थानावरुन नमूना घेवून त्याचा अहवाल देणे यासाठी ७०० रुपये आकारण्यात येणार आहेत. राज्यात कोणत्याही खासगी प्रयोगशाळेला या कमाल मर्यादेपेक्षा जास्त दर आकारता येणार नाही, अशी ताकिद देण्यात आली आहे.

सध्या चाचण्यांसाठी आवश्यक असणारे साहित्य माफक दरात उपलब्ध होत असल्याने तसेच आयसीएमआरने (ICMR) विविध उत्पादक कंपन्यांना मान्यता दिल्याने चाचणी साहित्याची उपलब्धता वाढली आहे.

Also Read: तिसऱ्या लाटेसाठी पालिका सज्ज

शिवाय सध्या वाहतूक व्यवस्था सुरळीत असल्याने त्यावरील खर्च देखील कमी झाला असल्याने खासगी प्रयोगशाळांना येणारा तपासणी खर्च कमी झाल्याचे सांगण्यात आले.

या सोबत राज्यात आयसीएमआर आणि एनएबीएलने (NBL) मान्यता दिलेल्या प्रयोगशाळांच्या संख्येत वाढ झाल्याने चाचण्यांचे दर कमी होणे आवश्यक असल्याने सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

दरम्यान आरटीपीसीआर चाचणीसोबतच रॅपीड अँटीजेन (rapid antigen), अँटीबॉडीज (antibodies) या चाचण्यांसाठी दर निश्चित करण्यात आले आहे. अँटीबॉडीज चाचण्यांसाठी रुग्ण स्वतः प्रयोगशाळेत आल्यास २०० रुपये, तपासणी केंद्रावरुन अथवा एकत्रित नमूने घेतल्यास २५० रुपये आणि रुग्णाच्या घरी जावून नमूने घेतल्यास ३५० असे दर निश्चित करण्यात आले आहेत.

तर सीएलआयए फॉर सार्स कोविड अँटीबॉडीज या चाचणीसाठी रुग्ण स्वतः प्रयोगशाळेत आल्यास ३०० रुपये, तपासणी केंद्रावरुन अथवा एकत्रित नमूने घेतल्यास ४०० रुपये, रुग्णाच्या घरी जावून नमूने घेतल्यास ५०० रुपये असे दर निश्चित करण्यात आले आहेत.

रॅपीड अँटीजेन टेस्टसाठी रुग्ण प्रयोगशाळेत अनुक्रमे १०० रुपये, १५० रुपये आणि २५० रुपये असे दर आता निश्चित करण्यात आले आहेत. तर सीबी-नैट अथवा ट्रूनेट चाचणीसाठी १२०० रुपये निश्चित करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here