@maharashtracity

मुंबई: गेल्या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठकीत (cabinet meeting) बत्ती गुल झाली होती. आता मंत्र्यांच्या बंगल्यातील बत्ती गुल (power cut) झाल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. मंत्रालय परिसरात वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट (BEST) उपक्रमाच्या वीज विभागाच्या रिसिव्हिंग स्टेशनमध्ये मंगळवारी सकाळी व संध्याकाळी असे दोन वेळा फॉल्ट झाल्याने बत्ती गुल झाल्याचे स्पष्टीकरण बेस्टकडून देण्यात आले आहे.

उन्हाळ्यात मुंबईसह राज्यात विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे कोळशाची कमतरता (coal crisis) भासत आहे. राज्यातील ग्रामीण भागात वीज भारनियमनाचे (loadshedding) चटके सहन करावे लागतात. मात्र मुंबईत विशेषतः शहर भागात टाटा वीज कंपनीकडून (Tata power) वीज खरेदी करून माफक दरात मुंबईकरांना अखंडित वीज पुरवठा करण्याबाबत बेस्ट उपक्रमाचे चांगले नाव आहे.

मात्र, गेल्याच आठवड्यात मंत्रिमंडळ बैठक सुरू असताना अचानक बत्ती गुल झाल्याची घटना घडली होती. त्याचप्रमाणे एका कार्यक्रमाप्रसंगी राज्यपाल भगतसिंह कोशयारी (Governor Bhagat Singh Koshyari) असताना बत्ती गुल होण्याची घटना घडली होती. तर आता या मंत्रिमंडळ बैठकीत राज्याच्या हिताचे निर्णय घेणाऱ्या मंत्र्यांच्या बंगल्यातच मंगळवारी सायंकाळच्या सुमारास बत्ती गुल झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

मंत्र्यांच्या बंगल्यात बेस्ट वीज विभागाची बत्ती गुल होण्याच्या घटनेबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आल्याचे समजते. कदाचित बेस्ट उपक्रमाला या बत्ती गुल प्रकरणाचा जाब मंत्र्यांकडून विचारला जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

रिसिव्हिंग स्टेशनमध्ये फॉल्ट

मंगळवारी सकाळी १० वाजता मरीन ड्राइव्ह रिसिव्हिंग स्टेशनला पहिला फॉल्ट झाला होता. तो दुरुस्त करण्यात आला. मात्र त्यानंतर सायंकाळच्या सुमारास पुन्हा दुसरा फॉल्ट झाला. त्यामुळे मंत्र्यांच्या बंगल्यात अंधार पसरला होता. मात्र बेस्टच्या वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ वीज दुरुस्तीबाबतची कामे हाती घेतली. त्यामुळे ६० ते ७० टक्के वीजपुरवठा पूर्ववत सुरू केला असून उर्वरित वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here