@maharashtracity
मध्य व हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत ;
झाड पडून एकजण जखमी
दहिसर नदीला उधाण
उपनगरात पावसाचा जोर
रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल
मुंबई: मुंबईला रविवारी झोडपून काढणाऱ्या पावसाने आज मुंबई उपनगरात बॅटिंग सुरू ठेवली. या पावसात सकाळच्या सुमारास मुलुंड, नवघर येथे झाड पडून धनाजी अंबा हाथीयानी (३१) ही व्यक्ती जखमी झाली.
तसेच, मुंबईच्या सीमेला लागून असलेल्या ठाणे रेल्वे स्थानक परिसरात पावसाचे पाणी साचल्याने मध्य व हार्बर रेल्वे सेवेवर त्याचा परिणाम होऊन वाहतूक काही तास विस्कळीत झाली होती. त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसून त्यांचे हाल झाले.
मध्य रेल्वेची ठाणे (Thane) ते सीएसएमटी (CSMT) रेल्वे स्थानक दरम्यानची वाहतूक काही तास विस्कळीत झाली होती. पुढे ठाणे ते कर्जत, कसारा या दरम्यान रेल्वे सेवा सुरू होती.
मात्र दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने मध्य व हार्बर रेल्वेची वाहतूक थोडी विलंबाने परंतु सुरळीत झाली.
दरम्यान, सोमवारी सकाळी ८ ते सायंकाळी ६ या कालावधीत शहर भागात – ३०.६९ मिमी, पूर्व उपनगरात – ४७.८२ मिमी आणि पश्चिम उपनगरात – ६१.३६ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
आगामी, २४ तासांत शहर व उपनगरे परिसरात मध्यम ते जोरदार पाऊस, तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
तसेच, पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गावर (Western Express Highway – WEH), एलबीएस मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. मुलुंड (Mulund) येथील सोनापूर भागात रस्त्यावर पाणी साचले होते. त्यामुळे त्याचा त्रास वाहन चालक, वाहक यांना झाला. त्याचप्रमाणे, मुलुंड येथील काही सोसायटयांमध्ये पावसाचे पाणी साचले होते. तसेच, निर्मल लाईफ स्टाईल मॉलबाहेरील भागात काही प्रमाणात पाणी साचले होते.
झाड दुर्घटनेत एकजण जखमी
उपनगरात सकाळी पावसाचा जोर होता. सकाळी ९ वाजेच्या सुमारास मुलुंड ( पूर्व) नवघर व्हिलेज, लेन क्र. २, येथे झाड अंगावर पडल्याने धनाजी अंबा हाथीयानी (३१) ही व्यक्ती जखमी झाली. त्यास तात्काळ स्थानिक नागरिकांनी नजीकच्या हिरामुंगी या खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले.
दहिसर नदीला उधाण
आज सकाळपासून पश्चिम उपनगरात चांगला पाऊस पडला. त्यामुळे बोरिवली (Borivli), कांदिवली (Kandivli), मालाड (Malad), दहिसर (Dahisar) भागात जोरदार पाऊस पडला. त्यामुळे दहिसर नदी पात्रातील पाण्याचा प्रवाह वाढला व नदीला उधाण आले होते. त्यामुळे नदी किनारच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.
बीडीडी चाळीत पाणी शिरले
वरळी (Worli) येथील बीडीडी चाळीत (BDD Chawl) पावसाचा जोर वाढल्याने काही प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे त्याचा रहिवाशांना त्रास झाला.