राज्यात एक्सबीबी नवीन व्हेरियंट

@maharashtracity

मुंबई: राज्यातील कोविड रुग्ण संख्या मागील आठवड्याच्या तुलनेत १७.७ टक्क्यांनी वाढली असल्याचे राज्य आरोग्य विभागाने सांगितले. ठाणे, रायगड आणि मुंबई भागामध्ये ही वाढ अधिक ठळक प्रमाणात दिसते आहे. सध्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हिवाळ्यामध्ये हे प्रमाण वाढू शकते, असा इशारा काही तज्ञांनी दिला आहे.

जनुकीय क्रमनिर्धारण तपासणीमध्ये (genome sequencing) सध्या राज्यात बीए. २.७५ चे प्रमाण ९५ टक्के वरून ७६ % वर आले आहे. दरम्यान, एक्सबीबी हा नवीन व्हेरियंट राज्यात आढळला असून त्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. हा व्हेरियंट बीए.२.७५ पेक्षा अधिक वेगाने पसरू शकतो. व्यक्तीची प्रतिकार शक्ती भेदण्याची क्षमता या नवीन व्हेरियंट मध्ये आहे.

यावर राज्य सर्वेक्षण अधिकारी डाॅ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, देशात प्रथमच बीए.२.३.२० आणि बीक्यू.१ हे दोन व्हेरीयंट राज्यात आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन डाॅ. आवटे यांनी केले आहे.

दरम्यान फ्ल्यू सारखा कोणताही आजार अंगावर न काढता तातडीने वैद्यकीय सल्ला घेऊन त्यानुसार उपचार करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच गर्दीमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी वावरताना कोविड अनुरूप वर्तन अंगीकारणे, केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे कोविड लस घेणे, अति जोखमीचे आजार असणाऱ्या व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना अधिक काळजी घेणे, शिवाय ज्यांना सर्दी खोकला अशी लक्षणे आहेत त्यांनी शक्यतोवर सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे असे सांगण्यात आले आहे.

राज्यात २०१ नवीन रुग्ण

सोमवारी राज्यात २०१ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. काल २१९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात आजपर्यंत एकूण ७९,७६,७२६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१४% एवढे झाले आहे. राज्यात आज एकही कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,५०,७९,३०५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,२७,९०० (०९.५५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज रोजी एकूण २,८०२ ॲक्टिव्ह रुग्ण असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here