मुंबई महानगरपालिकेच्या ११ विभागांमध्ये पथदर्शी उपक्रम

Twitter: @maharashtracity

मुंबई: आरोग्यसेवा क्षेत्राला डिजिटल बळकटी देण्यासाठी, तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी ऑनलाइन व्यासपीठ तयार करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने देशभरात आयुष्मान भारत डिजिटल मोहीम सुरू केली आहे. या ऑनलाईन व्यासपीठावर आरोग्यविषयक नोंदींसह आरोग्यसेवेची माहिती अगदी सहज मिळणार आहे. मुंबई महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभागदेखील या डिजिटल उपक्रमात सहभागी झाला असून पाथ या संस्थेच्या सहकार्याने मुंबई महानगरपालिकेच्या ११ विभागांमध्ये पथदर्शी उपक्रम राबवणार आहे. सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांची माहिती व उपचारविषयक नोंदी या ’आभा‘च्या संगणकीय प्रणालीत नोंदवून ’आयुष्मान भारत डिजिटल उपक्रमात सगभाग नोंदवावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

यावर बोलताना कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, भारताच्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने आयुष्मान भारत डिजिटल मिशन (एबीडीएम) हा उपक्रम हाती घेतला आहे. आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक (आभा), आरोग्य क्षेत्रातील व्यवसायिकांच्या नोंदी (एचपीआर), आरोग्य सुविधा नोंदी (एचएफआर) आणि ’आभा अप्लिकेशन’ आदी महत्वपूर्ण बाबी आणि त्यावर आधारित सुविधांचा यात समावेश आहे.

आयुष्मान भारत डिजिटल मिशन याअंतर्गत आयुष्मान भारत आरोग्य कार्ड (आभा कार्ड) वितरण प्रक्रिया सध्या वेगाने सुरू आहे. त्यासाठी रुग्णांची संपूर्ण माहिती आयुष्यमान भारतशी जोडण्यात येत आहे. यामुळे सर्व शासकीय वैद्यकीय अधिकारी रुग्णांच्या आरोग्याची माहिती एका क्लिकवर पाहू शकतील. यासाठी देशातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये स्वतंत्र सुविधा आहे. यामुळे रुग्णांवरील उपचाराचे पुढील नियोजन, तपासण्यांचा प्रत्येक अहवाल या व्यासपीठावर सहज उपलब्ध होऊ शकेल. रुग्ण कोणत्याही शासकीय रुग्णालयात किंवा या योजनेशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयात गेल्यास तेथील डॉक्टर अवघ्या काही क्षणात त्याच्या आरोग्याचा तपशील पाहून उपचाराची दिशा ठरवू शकतील, असेही डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here