Twitter: @maharashtracity

मुंबई: परळ येथील टाटा मेमोरियल सेंटरमधील (Tata Memorial Centre) रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना राहण्याची सोय व्हावी म्हणून टाटा रुग्णालयाने १०० खाटा असलेली धर्मशाळा उभारली आहे. या धर्मशाळेचे उद्घाटन मंगळवारी माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि रुग्णालयाचे संचालक डॉ राजेंद्र बडवे यांनी केले. 

यावेळी टाटा रुग्णालयाचे उपसंचालक प्रोफेसर डॉ. शैलेश श्रीखंडे, एचडीएफसी एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक नवनीत मुनोत, रोटरी डीस्ट्रीक्ट ३१४१चे गव्हर्नर संदीप अगरवाला, ‘रोटरी क्लब ऑफ बॉम्बेचे अध्यक्ष विनीत भटनागर आदि उपस्थित असल्याचे टाटा रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

१०० खाटाची धर्मशाळा

ही धर्मशाळा परळ भोईवाडा येथे ५ डी म्हाडाच्या इमारतीत आहे. या ठिकाणी १०० खाटांची सोय करण्यात आली आहे. म्हाडाच्या सहकार्याने ही धर्मशाळा उभी राहिली असून त्यातील फर्निचर व इतर सुविधा एचडीएफसी- एएमसीच्या सीएसआर फंडातून करण्यात आली. तर या कामाचे व्यवस्थापन रोटरी क्लब ऑफ बॉम्बेने केले असल्याची माहिती टाटा रुग्णालय प्रशासनाने दिली. 

या धर्मशाळेमध्ये अत्याधुनिक अशा सुविधा असून रुग्णालयापासून अगदी जवळ असल्याने रुग्णांना दिलासा मिळणार आहे. रुग्णांना वैद्यकीय सेवा अगदी जवळ मिळू शकणार आहे. यावर बोलताना टाटा रुग्णालयाचे डॉ. राजेंद्र बडवे यांनी सांगितले की, बाहेरून आलेले रुग्ण व त्यांच्या कुटुंबांवरील भार कमी होणार आहे. त्यांना उपचारादरम्यान राहण्यासाठी अतिरिक्त खर्च उचलावा लागत असे, तो भार आता कमी होईल अशी आशा डॉ. बडवे यांनी व्यक्त केली. 

तर म्हाडाच्या सहकार्यातून रोटरीने टाटा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गरीब व गरजू रुग्णांसाठी ही धर्मशाळा सुरु केली असून तिची क्षमता १०० खाटांची असल्याचे रोटरी डीस्ट्रीक्ट ३१४१चे गव्हर्नर संदीप अगरवाला यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here