शिक्षणासाठी बाहेरगावी जाणाऱ्या विद्यार्थी लसीविना परतले

मुंबई: मुंबईत पुन्हा लशींचा तुटवडा निर्माण झाला असून सध्या ४५ वर्षांवरील सुमारे १५ लाख नागरिक लशींच्या प्रतीक्षेत आहेत. लशी अभावी नियोजन कोलमडत असून लसीकरण केंद्रावर रांगा लावूनही डोस न घेता परतावे लागत असल्याने संताप व्यक्त केला जातो आहे.

सोमवारी कूपर रुग्णालय लसीकरण केंद्रावर लस तुटवड्याचा दुष्परिणाम दिसून आला. बाहेरगावी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना काही केंद्रांवरून लसीअभावी परतावे लागले. तर काही केंद्रांवर अन्य लाभार्थी ताटकळत उभे असलेले दिसून आले. यावर बोलताना पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, सोमवारी मुंबईतील १८७ लसीकरण केंद्रांवर लस देणे सुरु होते. मात्र लस तुटवडा असल्याचे ही काकाणी यांनी सांगितले.

शक्य असल्यास नोंदणी केलेल्या व नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना लस देण्याबाबतचे आदेश दिले होते असल्याचे ही काकाणी म्हणाले. दरम्यान जूनच्या शेवटच्या आठवडय़ात लशींचा पुरेसा साठा मिळाला होता. त्यानंतर लसीकरण केंद्रांवर प्रतिदिन लसीकरणाची संख्या ३० हजारांवरून अगदी ८० ते ९० हजारांपर्यंत गेली. मात्र आता पुन्हा लशींचा तुटवडा निर्माण झाल्याने पालिकेला लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागत आहेत.

मुंबईत कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी अनेकजण प्रतिक्षेत आहेत. अनेक नागरिकांचे ८४ दिवस पूर्ण झाल्यामुळे त्यांची लस घेण्यासाठी गर्दी होत आहे. मात्र लशींचा पुरेसा साठाच नसल्याने त्यांना लस मिळू शकलेली नाही.

शहरात ६० वर्षांवरील सुमारे ९ लाख ४८ हजार जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर ४ लाख ६० हजार जणांनी दुसरा डोस टोचून घेतला आहे. ४५ ते ५९ वयोगटातील सुमारे १२ लाख ७३ हजार जणांनी लशीचा पहिला डोस तर यातील फक्त २ लाख ६१ जणांना दुसरा डोस घेतला आहे. ४५ वर्षांवरील सुमारे १५ लाख नागरिक अजूनही लशीच्या दुस-या डोसच्या प्रतिक्षेत आहेत.

लसीकरणाला वेग आणण्यासाठी पालिकेचा प्रयत्न आहे. लशीचा साठा उपलब्ध झाल्यावर रोज सुमारे ८० ते ९० हजारावर लसीकरण केले जाते आहे. लसी पुरेसा उपलब्ध झाल्यास रोज दीड लाखापर्यंत लसीकरण करण्याची लक्ष्य पालिकेचे आहे. मात्र लशींचा पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याने पालिकेसमोर अडचणी निर्माण होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here