Twitter : @maharashtracity

मुंबई

महिला बचत गटातील महिलांना व्यवसायासाठी बळ मिळावे, त्यांचा व्यापार वृध्दींगत व्हावा या उद्देशाने मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आठवडी बाजार सुरू करण्याची संकल्पना सुचवली.

मे २०२३ मध्ये जनता दरबाराच्या माध्यमातून महिला बचत गटांनी त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी हक्काची जागा आणि प्रसिद्धी सासाठी संसाधने उपलब्ध नसल्याची तक्रार पालकमंत्री लोढा यांच्यासमोर मांडली होती. त्या अनुषंगाने सर्व महिला बचत गटांना आठवडी बाजाराच्या माध्यमातून हक्काची जागा देण्याचे आणि त्यांच्या उत्पादनाची प्रसिद्धी करण्याचे निर्देश पालकमंत्री लोढा यांनी दिले आहेत. १९ ऑगस्टपासून मुंबई महापालिकेतील २४ प्रभागांमध्ये दर आठवड्याला हा बाजार सुरू करण्यात येणार आहे.

पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते महालिकेच्या एन विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रथम आठवडी बाजाराचे उद्घाटन झाले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आमचे सरकार तत्पर असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली अशा नाविन्यपूर्ण संकल्पनांचे आयोजन नेहमीच होत राहील. जनता दरबाराच्या माध्यमातून समोर आलेल्या तक्रारींची दखल घेऊन नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करणे हे आमचे ध्येय आहे. त्या अनुषंगाने हा आठवडी बाजार सुरू करण्यात आला असून ही तात्पुरती राबवली जाणारी संकल्पना नाही. या योजेनेचा कायमस्वरुपी लाभ महिला बचतगटांना मिळणार आहे. यापुढे देखील महिलांच्या आर्थिक विकासासाठी या उपक्रमांतर्गत विविध बदल करण्यात येतील, असे पालकमंत्री लोढा यांनी सांगितले आहे.

आठवडी बाजारामध्ये सहभागी होण्यासाठी महिला बचतगटांना नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी केलेल्या ५० बचतगटांना महापालिकेतर्फे जागा उपलब्ध करून दिली जाईल. आठवडी बाजारात महिला बचत गटाकडून त्यांनी बनविलेल्या वस्तूंचे माहितीपत्रक ग्राहकांना देण्यात येईल, ज्यामुळे ग्राहक त्या वस्तु थेट महिला बचतगटाला संपर्क करुन मागवू शकतात व त्यांचा व्यवसाय निरंतर चालु राहील. महापालिकेच्या माध्यमातून वस्तीवस्तीत फलक लावून व स्पीकरच्या माध्यमातून आठवडी बाजारचा प्रचार करण्यात येत आहे. सोबतच सर्व महिला बचत गट सुद्धा घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. स्थानिक व्यापारी वर्गाला देखील या उपक्रमात सहभागी करून घेऊन त्यांना महिला बचत गटांसाठी व्यापाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

घाटकोपर पूर्व एन वार्डमधील सुचित्रा बिझनेस पार्क, बी. एम. सी. पार्किंग, पटेल चौक, घाटकोपर पूर्व येथे या आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे. 19 ऑगस्ट रोजी दुपारी 1 ते रात्री 9 वाजेपर्यंत तसेच 20 ऑगस्ट रोजी सकाळी 9 पासून रात्री 9 पर्यंत हा आठवडी बाजार सुरू राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here