केरळमधील डॉक्टरवर जीवघेणा हल्ल्याचा मार्डकडून निषेध

Twitter: @maharashtracity

मुंबई: देशातील डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याविरोधात देशभरातील डॉक्टर आवाज उठवत असताना केरळमध्ये डॉ. वंदना दास यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. यात त्या डॉक्टरांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर राज्यातील निवासी डॉक्टरांची संघटना मध्यवर्ती मार्डने चिंता व्यक्त करत या घटनेचा निषेध म्हणून गुरुवारी काळी फिती लावून शांततेच्या मार्गाने काम केले असल्याची माहिती मध्यवर्ती मार्डचे अध्यक्ष डॉ. अभिजीत हेलगे यांनी दिली.

यावेळी केरळ मधील डॉक्टरांच्या संपाला पाठींबाही देण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान मध्यवर्ती मार्ड संघटनेकडून ’देश डॉक्टरांच्या हाकेला जागे होईपर्यंत अजून किती डॉक्टरांचे बळी जातील असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

केरळमधील कोट्टाराकारा तालुका रुग्णालयात कर्तव्यावर असताना झालेल्या निर्घृण हल्ल्यानंतर डॉ. वंदना दास यांचे निधन झाल्याच्या वृत्ताने राज्यातील मध्यवर्ती मार्ड संघटनेला धक्का बसला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एवढ्या हुशार तरुण डॉक्टराचे स्वप्न विरले. या घृणास्पद आणि अमानुष कृत्याचा मध्यवर्ती मार्ड संघटना निषेध करत असून दोषीला तात्काळ अटक करुन सर्वोच्च शिक्षेची मागणी करत असल्याचे संघटनेच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आले.

देशातील डॉक्टरांना रुग्णालयांमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवावी आणि डॉक्टरांवरील अत्याचारासाठी कडक कायदे करण्याची मध्यवर्ती मार्डने मागणी केली आहे. तसेच केरळमधील डॉक्टरांच्या संपाला पाठिंबा म्हणून राज्यातील निवासी डॉक्टररांनी गुरुवारी कर्तव्यावर असताना डाव्या हाताला काळी फिती लावून शांततेच्या मार्गाने काम केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here