महाडमधील न्यायालयातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला केले अभिवादन

@maharashtracity

महाड –

महाड येथे चवदार तळे सत्याग्रह (Chavdar Tale Satyagrah) स्मृतिदिन लाखो भीमसागराच्या उपस्थित साजरा झाला. यावेळी दिल्लीचे सामाजिक न्याय मंत्री डॉ. राजेंद्र पाल गौतम (Dr Rajendra Pal Gautam) यांनीदेखील चवदार तळे येथे भेट देऊन डॉ बाबासाहेबांच्या (Dr Babasaheb Ambedkar) पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

प्रबुद्ध राष्ट्रीय संघाच्यावतीने घेण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमास डॉ. राजेंद्र पाल गौतम उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी चवदार तळे येथे भेट देऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  डॉक्टर राजेंद्र पाल गौतम यांनी महाड शहरातील न्यायालयाच्या इमारतीला देखील भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत गौतम कांबळे, ऍड. भिसे, आम आदमी पार्टीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. 

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदारतळे सत्याग्रह केल्यानंतर ज्या न्यायालयामध्ये चवदार तळ्याची केस स्वतः लढले होते. अशा पावन न्यायालयाच्या इमारतीला डॉक्टर राजेंद्र पाल गौतम यांनी भेट देऊन तेथील  बाबासाहेबांच्या पुतळ्या समोर नतमस्तक झाले. बाबासाहेबांनी महाड क्रांती भूमीत सामाजिक न्यायाची जागतिक पातळीवरची लढाई उभी केली. पक्षपात आणि जातीय अन्याय करणाऱ्या मनुस्मृतीचे दहन केले. अशा पावन भूमीत येण्याचे सद्भाग्य लाभल्याचे डॉ. राजेंद्र पाल गौतम यांनी सांगितले. 

महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची आणि फुले – शाहू – आंबेडकरांची भूमी आहे. या महाराष्ट्राने संपूर्ण देशाला सामाजिक न्यायाची प्रेरणा दिल्याचेदेखील राजेंद्र पाल गौतम यांनी सांगितले. संपूर्ण भारत बौद्धमय करण्याची बाबासाहेबांची संकल्पना पूर्ण करण्यासाठी या महाडमधून आपण संकल्प करूया, असेही त्यांनी सांगितले. बाबासाहेबांच्या संविधानावर आधारित सशक्त भारत उभा करण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here