@maharashtracity

मुंबई: दरवर्षी १ जून रोजी केरळात (Kerala) दाखल होणारा मान्सून यंदा मात्र चार दिवस आधीच म्हणजे २७ मे रोजी दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून करण्यात आला आहे.

मान्सून (Monsoon) लवकर दाखल होण्याची हवामान स्थिती असून मान्सून मॉडेलच्या ४ दिवसांच्या कमी अधिक त्रुटीसह दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच तत्कालीन मान्सून पुरक वातावरणीय स्थिती कायम राहिल्यास राज्यातही वेळेपूर्वी मान्सून दाखल होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, तत्कालीन हवामान तसेच मान्सून पुरक हवामान स्थिती कायम राहिल्यास २७ मे पासून सात दिवसात मान्सून राज्यात दाखल होईल. मात्र, वातावरणीय स्थितीतील बदल पुरक नसल्यास राज्यातील मान्सून दाखल होण्यास वेळ लागण्याची शक्यता हवामान विभागाच्या अधिकाऱ्याने व्यक्त केली.

भारतीय उपखंडात (Indian sub continent) दक्षिण अंदमानातून मान्सूनला सुरुवात होते. त्यानंतर मान्सूनचे वारे बंगालच्या उपसागरातून (Bay of Bengal) उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकतात. मान्सूनच्या दरवर्षी होणाऱ्या वाटचालींनुसार मान्सून २२ मेच्या सुमारास अंदमानात (Andaman) सरकतो. मात्र विषुयवृत्तीय वाऱ्याची सद्यिस्थिती पाहिल्यास मान्सून अंदमान समुद्र, अंदमान आणि निकोबार बेटे आणि आग्नेय बंगालच्या उपसागराच्या काही भागात १५ मे च्या सुमारास पुढील वाटचालीसाठी सज्ज झाल्याची चिन्ह आढळून आले असल्याचे भारतीय हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले.

नैऋत्य मान्सून साधारणपणे १ जून रोजी केरळमध्ये दाखल होऊन सुमारे ७ दिवसांच्या प्रमाणात सुरु होतो. केरळमधील मान्सून आगमन अंदाजाच्या मॉडेलमध्ये साधारणतः ६ वातावरणीय घटकांचा वापर केला जातो. यामधून केरळमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण आणि मान्सूनची सध्याची वाटचाल या बाबीचा सर्वकश अभ्यास करुन केरळमधील मान्सूनच्या आगमनाचा अंदाज करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. तसेच गेल्या १७ वर्षाची म्हणजेच २००५ ते २०२१ कालावधीतील आकडेवारी पाहिल्यास केरळमधील मान्सून आगमनाचे अंदाज २०१५चा अंदाज वगळता खरे ठरले आहेत.

पाच वर्षाचा मान्सून अंदाज व वास्तविकता

वर्ष वास्तविक तारीख अंदाज तारीख
२०१७ ३० मे ३० मे
२०१८ २९ मे २९ मे
२०१९ ८ जून ६ जून
२०२० १ जून ५ जून
२०२१ ३ जून ३१ जून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here