सेनेच्या ऋतुजा लटके विरुद्ध भाजपचे मुरजी पटेल यांच्यातच खरी लढत

@maharashtracity

मुंबई: अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर ३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक (Andheri bye-election) होणार आहे. त्यासाठी १४ ऑक्टोबर रोजी इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानुसार निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अर्जांची छाननी करून १४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरविले आहेत. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात शिवसेना (Shiv Sena) व भाजप (BJP) उमेदवारांमध्ये ‘कांटे की टक्कर’ होणार असल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे.

ही निवडणूक होण्यापूर्वीच शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या पालिका सेवेतील राजीनाम्याचे प्रकरण चांगलेच गाजले. पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ऋतुजा लटके यांची उमेदवारी व शिवसेनाही अडचणीत आल्याचे चित्र होते. मात्र, प्रकरण न्यायालयात गेले. तिथे ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना दिलासा मिळाल्याने त्यांनी आणि उद्धव ठाकरे गटाने सुटकेचा निःश्वास सोडला.

या निवडणुकीसाठी नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी १४ उमेदवारांची नामनिर्देशन पत्र वैध ठरली आहेत. त्यात राष्ट्रीय पक्षांचे दोन उमेदवार, नोंदणीकृत पक्षांचे तीन तर अपक्ष व इतर पक्षांचे नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

याबाबत अधिक माहिती देताना मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले की, येत्या सोमवारी म्हणजेच १७ ऑक्टोबर २०२२ रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. याचबरोबर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाच्या या पोटनिवडणुकीसाठी जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन ही मतदारांना केले आहे.

वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे व त्यांचा पक्ष पुढीलप्रमाणे -:

१) ऋतुजा रमेश लटके (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे)

२) मुरजी कानजी पटेल (भारतीय जनता पार्टी)

३) राकेश अरोरा (हिंदुस्थान जनता पार्टी)

४) बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी – पीपल्स)

५) मनोज श्रावण नायक (राईट टू रिकॉल पार्टी)

६) चंदन चतुर्वेदी (अपक्ष)

७) चंद्रकांत रंभाजी मोटे (अपक्ष)

८) निकोलस अल्मेडा (अपक्ष)

९) नीना खेडेकर (अपक्ष)

१०) पहल सिंग धन सिंग आऊजी (अपक्ष)

११) फरहाना सिराज सय्यद (अपक्ष)

१२) मिलिंद कांबळे (अपक्ष)

१३) राजेश त्रिपाठी (अपक्ष)

१४) शकिब जाफर ईमाम मलिक (अपक्ष).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here