@maharashtracity

मुंबई: ज्या अंधेरी पोटनिवडणूकीसाठी चिन्हापासून ते पक्ष गोठवून टाकण्याच्या ऐतिहासिक घटना घडल्या, ती अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणूक बिनविरोध होणार असल्याची चिन्ह दिसून येत आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दिलेल्या पत्रातून अंधरी पोटनिवडणूकीतून भाजपाने माघार घ्यावी, असे कळवले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनीदेखील महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीनुसार ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. रविवारच्या या दोन राजकीय विधानांमुळे अंधेरीतील निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून अंधेरीतील पोटनिवडणूकीतून (Andheri bye-election) माघार घ्यावी असे आवाहन केले. तसेच ही पोटनिवडणूक न लढविण्याचे सुचवले. त्यामुळे भाजपाच्या (BJP) भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

शिवसेना खासदार अरविंद सावंत (Shiv Sena MP Arvind Sawant) यांनी राज यांच्या या भूमिकेचे स्वागत करत महाराष्ट्राची राजकीय संस्कृतीच तशीच असल्याचे सांगितले. तर प्रसार माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी सांगितले की, दिवंगत रमेश लटके यांच्या निधनानंतर ऋतुजा लटके निवडणूक लढत आहेत. मुरजी पटेल यांनीही निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. मात्र ही निवडणूक बिनविरोध व्हावी असे मत पवार यांनी व्यक्त केले. 

मनसेच्या आवाहनावर बोलताना पवार म्हणाले की, राज यांनी घेतलेल्या भूमिकेवर तक्रार करण्यासारखे काहीही नसून अंधेरीतील पोटनिवडणूकीत निवडून येणाऱ्या उमेदवाराला पुन्हा दिड वर्षाने निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. तसेच ही निवडणूक बिनविरोध व्हावी असे आवाहन पवार यांनी केले. यावेळी पवार यांनी गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) घेतलेल्या माघारीचा प्रसंग सांगितला. त्यावेळी मुंडे कुटुंबियांपैकी निवडणूक रिंगणात उतरणाऱ्या सदस्याला पाठिंबा देणार असल्याची भुमिका पवार यांनी घेतली होती.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here