By Sadanand Khopkar

Twitter : @maharashtracity

मुंबई: हक्कभंग नोटीसीला राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दिलेल्या उत्तराने सभागृहाचे समाधान झालेले नाही. राऊत राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यामुळे पुढील कारवाईसाठी त्यांच्या विरोधातील प्रस्ताव उपराष्ट्रपती तथा राज्यसभेच्या पदसिद्ध अध्यक्षांना पाठवला जात आहे, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज सभागृहात स्पष्ट केले.

खासदार राऊत यांनी १ मार्च रोजी कोल्हापूर दौर्‍यात पत्रकारांशी बोलतांना विधिमंडळाचा उल्लेख ‘चोरमंडळ’ म्हणून केला. त्याबद्दल राज्यभरात खळबळ माजली होती. भाजप सदस्य अतुल भातखळकर यांनी या प्रकरणी राऊत यांच्या विरोधात हक्कभंग दाखल करून घेण्याची मागणी केली होती. संजय राऊत यांनी महाराष्ट्र विधीमंडळासह मुख्यमंत्री आणि अन्य मंत्री यांचा अवमान केला. त्यामुळे त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई झालीच पाहिजे, असा आग्रह भातखळकर यांनी धरला होता. त्यानंतर राऊत यांना हक्कभंगाची नोटीस पाठवण्यात आली होती. आज त्यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव विधानसभेत मांडण्यात आला. त्यानंतर आता पुढील कारवाईसाठी राऊत हे सदस्य असलेल्या राज्यसभेच्या अध्यक्षांकडे हे प्रकरण पाठवण्यात आले.

खासदार राऊत यांनी नोटीसला उत्तर देताना आपण विधीमंडळाला चोर म्हटले नाही असे उत्तरात स्पष्ट केले होते. मात्र त्यांच्या उत्तराने सभागृहाचे समाधान झालेले नाही. ते राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यामुळे पुढील कारवाईसाठी त्यांच्या विरोधातील प्रस्ताव उपराष्ट्रपती तथा राज्यसभेच्या पदसिद्ध अध्यक्षांना पाठवला जात आहे, अशी माहिती विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाला दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here