@maharashtracity

महिलांसाठी ‘लेडीज फर्स्ट लेडीज स्पेशल’ १०० बसगाड्या ६ नोव्हेंबरपासून धावणार

मुंबई: मुंबई महापालिकेची (BMC) आगामी निवडणूक तोंडावर आलेली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या आदेशाने मुंबईतील महिलांसाठी येत्या ६ नोव्हेंबरपासून ‘लेडीज फर्स्ट लेडीज स्पेशल’ १०० बसगाड्या (Ladies First Ladies Special Bus) रस्त्यावर धावणार आहेत.

विशेष म्हणजे या बसेसमध्ये ९० बसेस वातानुकूलित असणार आहेत. त्यामुळे दिवाळीनिमित्त मुख्यमंत्री भाऊरायांकडून महिलामंडळींना खास भाऊबीज भेटच (Bhau beej gift by CM) दिली जात असल्याची चर्चा आहे.

बेस्ट उपक्रमाने महिलांसाठी काही कालावधीपूर्वी सुरू केलेली “तेजस्विनी” बससेवा (Tejaswini Bus) कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने बंद पडली होती. सध्या या तेजस्विनीमधून महिलांसह पुरुष मंडळीही प्रवास करीत आहेत.

Also Read: अखेर पर्यटकांसह बेस्टच्या ‘ओपन डेक बस’ ची मुंबई सफर सुरू

आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानेच महिलांसाठी विशेष बससेवा सुरू होणार असल्याने महिला वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

मुंबईकरांसाठी रेल्वेनंतर दुसरी ‘लाईफ लाईन’ म्हणून बेस्ट बस सेवेला प्रवासी पसंती देतात. बेस्ट बसेसने दररोज ३० लाख प्रवासी प्रवास करतात. यात महिला नोकरदार प्रवाशांची संख्या मोठी आहे. बेस्ट बसेसमध्ये महिला प्रवाशांना प्रथम प्राधान्य देण्यात येत असून त्यांच्यासाठी काही आसने आरक्षित ठेवण्यात आली आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, महिला प्रवाशांचा प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा यासाठी आता भाऊबीज निमित्ताने महिला प्रवाशांना अनोखी भेट देत १०० ‘लेडीज फर्स्ट लेडीज स्पेशल’ ६ नोव्हेंबरपासून सुरु करण्याचे आदेश बेस्ट उपक्रमाला दिले आहेत.

त्यानुसार, बेस्टद्वारे २७ बस आगारातून मुंबई शहर व दोन्ही उपनगरातील १०० बस मार्गावर ‘लेडीज फर्स्ट लेडीज स्पेशल’ बस सेवा सुरु करण्यात येणार आहे.

सध्या शहरातील विविध मार्गावर बेस्टच्या ३७ महिला स्पेशल बस धावतात. त्यात या १०० बसची भर पडल्यामुळे एकूण महिला स्पेशल बसची संख्या १३७ हाेणार आहे. यामुळे गर्दीच्या वेळेस महिला प्रवाशांना माेठा दिलासा मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here