भाजपासह शिंदे – पवार गटाचे उमेदवार निवडून आणण्याची

By Milind Mane

Twitter : @manemilind70

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून भाजपाचे सर्वाधिक खासदार निवडून आणण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अजित पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली असून त्यांनी लोकसभेची रणनीती महाराष्ट्रात ठरवावी, असे ठरल्याचे खात्रीलायकरीत्या समजते.

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वारे राज्यात जोरदार वाहू लागले आहेत. त्यादृष्टीने भारतीय जनता पक्षाने केंद्रापासून राज्यात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. प्रत्येक विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघनिहाय निवडणूक प्रमुखांची घोषणा देखील भाजपाने केली आहे. राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघापैकी 23 लोकसभा मतदारसंघात भाजपाचे खासदार आहेत.

भाजपाने संघटनात्मक पातळीवर जोर देण्यात सुरुवात केली असून केंद्रीय मंत्र्यांच्या दौरा महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघ व विधानसभा मतदारसंघनिहाय सुरू आहे. असे असले तरी उद्धव ठाकरेंची शिवसेना भाजपापासून लांब गेल्याने येणाऱ्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला त्याचा फटका बसण्याची शक्यता भाजपाने केलेल्या सर्वेमध्ये आढळून आला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यात लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा सर्वे केल्यानंतर त्यांना लोकसभेतील विद्यमान भाजपाचे 23 पैकी दहाच खासदार निवडून येतील असा रिपोर्ट प्राप्त झाला. अन्य खासदार डेंजर झोनमध्ये असल्याने याचा फटका केंद्रात सत्ता स्थापन करताना बसणार आहे. या पार्श्वभूमीवर अमित शहा अलर्ट झाले असून त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून लोकसभेसाठी नवीन रणनीती आखल्याचे सांगितले जात आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असणारे खासदार देखील निवडून येण्याची शक्यता कमी आहे. त्यातच शिंदे गटातील खासदार, आमदारांचे व मंत्र्यांच्या बेताल वक्तव्यामुळे महाराष्ट्रात भाजपा विरोधात वातावरण तयार झाले आहे. याचा फटका भाजपाला बसणार असल्याने अमित शहा यांनी राज्यात भूकंप घडवीत नवीन रणनीती आखली आहे.

राज्याचे नवीन उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल, नाशिकचे राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ, तसेच रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीची जबाबदारी अमित शहा यांनी टाकल्याची खात्रीलायकरित्या सांगण्यात येत आहे. पवार, पटेल, भुजबळ व तटकरे या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर राज्यातील विद्यमान भाजपा खासदारांना निवडून आणण्यापाठोपाठ पवार गटाचे खासदार निवडून आणण्यासाठी तसेच एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेलेल्या शिवसेनेच्या खासदारांच्या मतदार संघातील परिस्थिती काय आहे, त्या ठिकाणी कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो, याची देखील चाचपणी करून त्याबाबत रणनीती ठरविण्यास अमित शहा यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अजित पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ व सुनील तटकरे हे राष्ट्रवादीतील मातब्बर नेते असून राष्ट्रवादीला सत्तेपर्यंत पोहोचविण्यास तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यात हे माहीर असल्याने त्या संधीचा फायदा अमित शहा यांनी घेतला आहे. या नेत्यांवर त्यांनी महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्याच्या राजकारणात नव्या घडामोडी घडण्याबरोबरच शिंदे गटाकडे जाणाऱ्या कार्यकर्त्यांचा ओघ थांबू शकतो, त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here