By Milind Mane

Twitter : @manemilind70

मुंबई: मागील वर्षभरापूर्वी शिवसेना पक्षातून एकनाथ शिंदे यांनी बाहेर पडून सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिंदे गटातील आमदारांना मिळालेले पोलीस संरक्षण पाहता त्याच धर्तीवर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील आमदारांना देखील संरक्षण द्यावे लागणार आहे. त्यामुळे राज्यातील गृह खात्यातील पोलिसांवर वाढता ताण पडणार असल्याने भविष्यात जनतेच्या प्रश्नांऐवजी राजकीय पुढार्‍यांचे संरक्षण पोलिसांनी करायचे का? असा सवाल गृह खात्यातील कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे.

एकनाथ शिंदे यांची शिवसेना देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सत्तेत सामील झाल्यानंतर त्यांच्यासोबत असणाऱ्या चाळीस आमदारांना येणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गृह खात्याकडून प्रत्येक आमदाराला वाय दर्जाची सुरक्षा दिली गेली. त्यामुळे गृह खात्यावर मोठा ताण पडला होता, काही आमदारांना आवश्यकता नसतानाही पोलिसांना त्यांच्या पुढेमागे वावरावे लागत होते.

शिंदे गटातील आमदारांना वर्षभरापासून देण्यात आलेल्या अवाजवी सुरक्षेमुळे आधीच गृह खात्यातील पोलीस संतप्त झाले होते. त्यातच एस्कॉर्टसहित पोलिसांच्या गाड्या असल्याने इंधनाच्या नाहक खर्च व वाहनांचा अतिरिक्त भार गृह खात्यावर पडला होता. याबाबत अनेक वेळा विरोधी पक्षांनी व राज्यातील जनतेने याबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली होती. शिंदे गटातील 40 आमदारांना देण्यात आलेले गृह खात्याचे संरक्षण पाहता त्याची पुनरावृत्ती अजित पवार गटातील आमदारांच्या बाबतीत करावी लागणार असल्याने गृह खात्यातील वरिष्ठ अधिकारी चिंतेत पडले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here