मुंबई भाजपा ट्विटर अकाउंटवरून शरद पवारांवर शरसंधान

By Anant Nalavade

Twitter : @NalavadeAnant

मुंबई: समृद्धी महामार्ग अपघात प्रकरणी शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला मुंबई भाजपा ट्विटर अकाउंटवरून ‘विनाश काले विपरीत बुद्धि.. !’ असे ट्विट करत जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. यावेळी #GetWellSoonSharadPawar असा हॅशटॅग देखील वापरण्यात आला.

बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचा भीषण अपघात होऊन २५ लोकांचा मृत्यू झाला. संपूर्ण महाराष्ट्र या घटनेमुळे हळहळला आहे. या ठिकाणी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणीही केली. तसंच मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदतही जाहीर केली आहे. मात्र, तरीही अश्या बिकट प्रसंगी राजकीय हेतूने ‘अपघातात मृत्यू झाल्यास तो देवेंद्रवासी झाला..’ अशी कुत्सित टीका पवार यांनी केली. त्याचा मुंबई भाजपनेही खरमरीत शब्दांत समाचार घेतला.

‘समृद्धीचं बांधकाम एकदम सेफ’

या दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्ग एकदम सुरक्षित असल्याचे म्हटले. समृद्धीचं बांधकाम पुर्णतः सुरक्षित आहे. त्यामध्ये काहीही अडचण नाहीये. कारण आतापर्यंत जेवढ्या घटना घडल्या आहेत, त्यात रस्त्याच्या बांधकामामध्ये काही समस्या असल्याचे समोर आलेले नाहीये. काही ठिकाणी मानवी चुका तर तर काही ठिकाणी वाहनांमध्ये बिघाड असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महामार्गाच्या बांधकामाबद्दल बोलणं उचित नाही. आपण उपाययोजना करत आहोत. अपघात होणार नाही यासाठी आपण स्मार्ट सिस्टीम बसवत आहोत आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातूनही आपण मॉनिटरींग करणार आहोत, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here