@maharashtracity

नगरपंचायतीत 17 पैकी 11 जागांवर विजय!

शिवसेना 4, काँग्रेस आणि अपक्षला प्रत्येकी एक, तर राष्ट्रवादीला शून्य जागा

ज्ञानेश्‍वर नागरेंचे 40 वर्षांचे राजकीय साम्राज्य संपुष्टात

धुळे: धुळे जिल्ह्यातील साक्री नगरपंचायतीत (Sakri Nagar Panchayat) भाजपाने एकहाती सत्ता काबीज करत शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीला (Shiv Sena – NCP alliance) अक्षरशः धूळ चारली. 17 पैकी तब्बल 11 जागांवर भाजपने विजय मिळविला. तर शिवसेनेला चार, काँग्रेसला एक, अपक्ष एक जागांवर विजयी झाले तर राष्ट्रवादीला एकही जागा मिळविता आली नाही.

बुधवारी आलेल्या निकालावरुन साक्री नगरपंचायतीवर भाजपचीच एकहाती सत्ता स्थापण्याचे सर्व मार्ग मोकळे झाले आहे. शिवाय, साक्री नगरपंयाचतीत गेल्या 40 वर्षापासून सत्तेस असलेले आधी काँग्रेस (Congress), नंतर शिवसेनेत (Shiv Sena) दाखल झालेले ज्ञानेश्‍वर नागरे यांचे राजकीय साम्राज्य पुर्णपणे उध्वस्त झाल्याच्या राजकीय चर्चा आहेत.

शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीतर्फे महसूल राज्यमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दूल सत्तार (Guardian Minister Abdul Sattar), पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil), शिवसेनेच्या आ. मंजुळा गावीत, माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी संपूर्ण ताकद पणाला लावूनही भाजपने एकहाती सत्ता मिळवित साक्रीत चमत्कार घडवून आणला.

येथील नगरपंचायतीच्या 17 पैकी 13 जागांसाठी पहिल्या टप्प्यात 21 डिसेंबरला, तर उर्वरित चार जागांसाठी मंगळवारी दि.18 रोजी मतदान झाले. तर बुधवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. अवघ्या तासाभरात सर्व 17 वॉर्डांचे निकाल जाहीर झाले. यात भाजपने 11 वॉर्डांत, शिवसेनेने चार वॉर्डांत, तर एका जागेवर अपक्ष, तर एका जागेवर काँग्रेसने विजय मिळविला.

शिवसेनेसोबत आघाडी करुन लढणार्‍या राष्ट्रवादीला एक जागाही मिळविता आली नाही. निकाल हाती येत असतानाच सुरुवातीला बहुतांश वार्डात भाजपचे उमेदवार विजयी होत असल्याने शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीमध्ये चलबिचल सुरु झाली होती.

साक्री ग्रामपंचायत होती तेव्हापासून तेथे ज्ञानेश्‍वर उर्फ नाना नागरे सत्तेत होते. पुढे नगरपंचायत झाल्यानंतरही साक्रीकरांनी नागरेंकडे एकहाती सत्ता सोपविली होती. गेल्या 40 वर्षापासून नागरे तेथे राज्य करत होते. सत्तेपासून नागरेंनीच भाजपला वेळोवेळी दूर ठेवले होते.

मात्र, यावेळेला नागरेंची सत्ता उलथवून टाकण्यासाठी भाजपनेही कंबर कसली होती. निवडणुकीचे योग्य नियोजन करून भाजपने सर्व 17 जागांवर उमेदवार दिल्याने ही निवडणूक चुरशीची झाली. शिवाय, यावेळी शिवसेना-राष्ट्रवादीने आघाडी करुन लढण्याचे ठरविले होते. तर काँग्रेसने स्वबळाचा नारा देत वेगळी चूल मांडली होती.

भाजपने नागरेंची सत्ता उलथवून टाकत साक्रीत परिवर्तन घडविले. तेथे 17 पैकी तब्बत 11 जागांवर विजय मिळवित सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपने साक्रीत आपली पकड मजबूत केली आहे.

साक्रीकरांनी भाजपला पसंती देत सत्तेत पाठविल्याने भाजपतर्फे धुळे शहर व साक्री शहरातील पक्ष कार्यालयाजवळ एकच जल्लोष करण्यात आला. पक्षाच्या विजयी उमेदवारांसह पक्ष प्रभारी शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, खासदार डॉ. सुभाष भामरे, सुरेश पाटील, शिवाजीराव दहिते, हर्षवर्धन दहिते, सचिन दहिते, धुळ्याचे महापौर प्रदीप कर्पे, माजी महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर भगवान गवळी, हिरामण गवळी, बंटी मासोळे, मोहन सूर्यवंशी यांच्यासह स्थानिक नेते विजय भोसले आदींनी समर्थकांसह एकच जल्लोष केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here