By Sadanand Khopkar

Twitter: @maharashtracity

मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त एक वर्षात सहा एप्रिल २०२४ पर्यंत राज्यातील तीन कोटी जनतेपर्यंत पोहचविण्याचा संकल्प प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे जाहीर केला. पक्षाच्या महाविजय-२०२४, मिशनचाच हा भाग असून येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राज्यातून एकावन्न टक्के मते मिळवण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी  पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, गुरुवारी सहा एप्रिल रोजी भाजप वर्धापनदिन दिनानिमित्त राष्ट्रीय अध्यक्ष पक्ष मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही मार्गदर्शन होईल. केंद्रीय कार्यालयाने योजल्यानुसार विविध कार्यक्रमांचे आयोजन राज्यभरात केले जाईल. राज्यातील ९७ हजार बूथ कार्यालयांतून इतर पक्षांतून येणा-यांचे पक्षप्रवेश होतील. या नंतर प्रत्येक मंगळवार हा पक्षप्रवेशाचा वार असेल, असेही बावनकुळे यांनी यावेळी जाहीर केले.

महाविजय-२४, यशस्वी करण्याबाबत ते म्हणाले, लोकसभेच्या ४८ जागा आणि विधानसभेच्या २०० जिंकण्यासाठी आमचे काम सुरू झाले आहे. (BJP targets to win 48 LS and 200 assembly seats) राज्यातील तीन कोटी नागरिकांना भाजपशी जोडून घेण्यासाठी 78007800 हा क्रमांक असल्याची माहितीही त्यांनी दिली. 

‘सरल’ ॲपच्या साहाय्याने पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारच्या योजना, निर्णयांची माहिती जनतेला मिळेल, असेही बावनकुळे म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे अष्टपैलू नेतृत्व राज्यातील तेरा कोटी जनतेने मान्य केले असून राज्यातील भाजपचे ते एकमेव सर्वोच्च नेते आहेत असे जाहीर केले. महाराष्ट्रातील वातावरण बिघडवू नका, विधायक सुचनांचे स्वागत करू, मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ज्यांनी कामे करून घेतली त्यांनी पुन्हा फडणवीस यांच्याविरोधात बोलल्यास सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here