काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांची भूमिका

By Anant Nalavade

Twitter: @nalavadeanant

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी स्थानिक पातळीवरील वस्तुस्थिती जाणून घेणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर काँग्रेसची आघाडी आधीपासून आहेच. पण आता या आघाडीत शिवसेनाही आहे. त्यामुळे निवडणुकीत स्थानिक पातळीवर समन्वय राहणे महत्वाचे आहे. चर्चेअंती महा विकास आघाडीचा (मविआ) जो उमेदवार ठरेल त्याला निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशी भूमिका मांडत काँग्रेस पक्ष राज्यातील ४८ मतदारसंघातील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी दोन दिवसांची आढावा बैठक घेत असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी टिळकभवन या पक्षकार्यालयात एका पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

चव्हाण पुढे म्हणाले की, ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभ दिवशीच काँग्रेसची आढावा बैठक होत असून या बैठकीतून प्रत्येक मतदारसंघातील नेते व पदाधिकारी यांचे मत काय आहे, त्यांच्या भागात कोणते मुद्दे महत्वाचे आहेत याची साधक बाधक चर्चा होणार आहे. या बैठकांनंतर जिल्हा जिल्हा पातळीवर जबाबदाऱ्या निश्चित केल्या जातील.

२०१९ ची परिस्थिती व आताची परिस्थीती यात फरक आहे. एखाद्या निवडणुकीत जागा कमी जिंकल्या म्हणजे तीच परिस्थिती कायम रहात नसते, परिस्थिती बदलत असते. सर्व बाजूंचा विचार करुन निर्णय घेतला जाईल. तीन्ही पक्ष एकत्र लढले तर भाजपाचा पराभव करणे कठीण नाही. जागा वाटपावरून महाविकास आघाडीवर काही परिणाम होणार नाही. आम्ही एकत्र राहून भाजपाला पराभूत करू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

देशातील राजकीय चित्र झपाट्याने बदलत आहे. कर्नाटकात काँग्रेसचा मोठा विजय झालेला आहे. देशभर भाजपाविरोधी वातावरण आहे म्हणूनच पराभवाच्या भितीने भाजपा सरकार राज्यातील महापालिका, नगरपालिका यांच्या निवडणुका घेत नाही. नगरपालिका, महानगरपालिकांमध्ये दोन-तीन वर्ष प्रशासक आहेत. विधानसभा व लोकसभा निवडणुका एकत्र होतील अशी चर्चा आहे. पण कदाचित या दोन निवडणुकांबरोबर महापालिका व नगरपालिका निवडणुकाही घेतील असे वाटते, अशी कोपरखिळीही चव्हाण यांनी मारली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here