Twitter: @maharashtracity
मुंबई: एफडीआय अर्थात थेट विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर असून एकूण गुंतवणूक २.३६ लाख कोटी रुपये इतकी असून ८६ हजार कोटी रुपये गुंतवणूक असलेले गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते.
फडणवीस यांनी यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लिहिलेल्या एका पत्रालाही उत्तर दिले. शिक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्राच्या पुढे कर्नाटक राज्य आहे. पहिल्या पाच श्रेणीत कोणतेच राज्य नाही. त्यामुळे आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत असा दावा त्यांनी केला. विरोधी पक्षांना राज्याचे विषयच माहित नाहीत. त्यांचे नेहमीप्रमाणे पत्र आले. पत्राऐवजी त्यांनी लक्षवेधी एकत्र करून ग्रंथ पाठवला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
ते म्हणाले, विधिमंडळ हे लोकशाहीचे मंदिर आहे. आमची ताकद वाढली आहे पण, शक्तिचा दुरूपयोग होणार नाही. लोकहिताचे प्रश्न सभागृहात उपस्थित होतील, त्यांना समाधानकारक उत्तरांनी न्याय दिला जाईल. विधेयकांवर साधक – बाधक चर्चा केली जाईल. माननीय सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाने निर्णय देऊनही विरोधी पक्षांनी सरकार असंवैधानिक, बेकायदेशीर आहे, असे म्हणणे चुकीचे आहे, या शब्दात फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली.
राज्यात अजूनही समाधानकारक पाऊस नाही, काही ठिकाणी पेरणी झाली नाही, हे मान्य करतानाच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात अधिवेशनात सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली जातील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.