Twitter: @vivekbhavsar

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून अजित पवार हे शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे विधानसभेतील राष्ट्रवादीचे पक्षीय बलाबल अजित पवार आणि शरद पवार गटात विभागले गेले आहे. त्यामुळे सर्वाधिक 45 सदस्य संख्या असलेल्या काँग्रेसकडे विधानसभेतील विरोधी पक्ष नेते पदाची संधी चालून आली आहे. या पदाची माळ बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण की पृथ्वीराज चव्हाण या पैकी कोणाच्या गळयात पडते हे सोमवारी निश्चित होईल, अशी शक्यता आहे.

काँग्रेसचे विधिमंडळातील गटनेते बाळासाहेब थोरात विधानसभेतील विरोधी पक्ष नेते असतील, यावर जवळपास शिक्कमोर्तब झाले आहे. मात्र, या पदावर नाना पटोले  यांचाही डोळा आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत बैठक घेऊन काँग्रेस विरोधी पक्ष नेते पदावर दावा करणार असल्याचे सूचित केले. विरोधी पक्ष नेते कोण व्हावा, याबाबत नाना पटले यांची निवड भिन्न असली तरीही पक्षाचा गट नेता हाच विरोधी पक्षनेते पदाचा दावेदार असतो, अशी माहिती काँग्रेसच्या माजी  मंत्र्याने maharashtra.city ला दिली.

नाना पटोले यांचे राज्यातील अन्य वरिष्ठ नेत्यांशी फारसे जमत नाही. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, डॉ नितीन राऊत, विजय वडेट्टीवार या वरिष्ठ नेत्यांशी नाना पटोले यांचे फारसे सख्य नाही. त्यामुळे पटोले यांना त्यांच्या मर्जीतील विरोधी पक्ष नेता हवा आहे.

पक्षातील अन्य एका ज्येष्ठ आमदाराने दावा केला की, नाना पटोले यांनाच विरोधी पक्षनेते पद हवे आहे. ही जबाबदारी अशा ज्येष्ठ नेत्यांकडे द्यावी लागेल जो सरकार विरोधात सभागृहात तुटून पडेल, असे सांगून या आमदाराने सांगितले की, कदाचित अशोक चव्हाण किंवा पृथ्वीराज चव्हाण यांच्या पैकी एकाकडे ही जबाबदारी येवू शकेल.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवार दिनांक १७ जुलै रोजी सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पक्षीय बलाबल लक्षात घेऊन काँग्रेसकडून विरोधी पक्ष नेते पदाचे नाव सुचवले जाईल आणि अध्यक्ष ते जाहीर करतील. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here