Twitter : @vivekbhavsar
मुंबई: आज होईल, उद्या होईल, असे रोज तारीख पे तारीख मिळत असलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला आता मुहूर्त लागत नाही, अशीच शक्यता वर्तवली जात आहे. राज्य विधिमंडळाच्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप होईल, असे आश्वासन भाजप आणि शिवसेनेच्या राज्यातील शीर्ष नेत्यांनी दिले होते. मात्र, अजूनही त्याला मुहूर्त मिळत नसल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.
शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही तासात राज्याच्या कारभाराचा गाडा स्वतःकडे घेण्याचा आक्रमक प्रयत्न केला. अर्थमंत्री असल्याच्या थाटातच ते वावरत असून तशा प्रकारच्या मीटिंग घेणे आणि सूचना देणे त्यांनी मंत्रालयातून सुरू केले आहे. देवगिरी या त्यांच्या शासकीय निवासस्थानी सकाळी सात वाजेपासून समर्थकांची आणि काम घेऊन येणाऱ्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची रीघ लागलेली असते. अद्याप खातेवाटप झाले नसले तरीही अजित पवार ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत. बुधवारी रात्री त्यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या मांडल्या. पवार यांना अर्थ खाते हवे आहे तर देवेंद्र फडणवीस यांची भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे खाते अजित पवार यांना देण्यास तीव्र विरोध करत आहे. त्यामुळे एकीकडे अजित पवार गटात जशी अस्वस्थता आहे, तशीच अस्वस्थता शिंदे आणि शिवसेना आणि भाजपमध्ये देखील आहे.
मंत्री पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेले भरत गोगावले वर्षा निवासस्थान सोडायला तयार नाही. गेले तीन दिवस त्यांनी एकनाथ शिंदे यांना जेरीस आणले आहे. तर दुसरीकडे अपक्ष आमदारांचे नेते बच्चू कडू यांनी देखील एकनाथ शिंदे यांची भेट न घेता मंत्रिपदासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अपक्ष आमदारांचा गट या सरकारवर नाराज असून त्यांना मंत्रिमंडळात योग्य स्थान न मिळाल्यास बाहेर पडण्याचा विचार करू, असा इशारा अपक्ष आमदारांच्या गटाकडून शिंदे यांना दिला गेला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
दुसरीकडे राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या आधीच मंत्रिमंडळ विस्तार करू, असे चॉकलेट शिंदे गटातील नाराज आमदारांना दिले गेले होते. मात्र दोन दिवसावर अधिवेशन येऊनही मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा नाही. आता तर निव्वळ खाते वाटप करून मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशन झाल्यानंतर बघू, असा मतप्रवाह भाजप आणि शिंदे गटांच्या नेत्यांमध्ये आहे. मंत्रिमंडळ विस्तार करून आणखीन नाराजी ओढवून घेण्यापेक्षा हा विस्तारच लांबवू या, या मतावर दोन्ही पक्षाच्या नेत्यांचे एकमत झाल्याचे समजते. ही बातमी फुटल्यापासून शिंदे गटामध्ये प्रचंड अस्वस्थता असून शिंदे गटातील आमदार एकमेकांना संपर्क साधून पुढे काय भूमिका घ्यायची याबाबत गंभीरपणे चर्चा करत आहेत.
अजित पवारांना महत्त्वाची खाती दिली गेल्यास शिंदे गटामध्ये पुन्हा एकदा बंडाळी उफाळून येऊ शकते. यातील काही आमदार पुन्हा ठाकरे गटाकडे जाण्याचा विचार करत असल्याचे एका आमदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे – फडणवीस – पवार सरकारवर कठोर भाषेत टीका केली आहे. शपथविधी झाल्यानंतर लगेचच खाते वाटप केले जाते, असा प्रघात असताना आजपर्यंत हे सरकार आपल्या मंत्र्यांना खाते वाटप करू शकले नाही, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. तर उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी देखील या सरकारचा पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, असे भाकीत करीत शिंदे गटातील आमदारांवर टीका केली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यामध्ये बैठकांचा सिलसिला सुरू आहे. खातेवाटप हा त्यांच्या पुढील सगळ्यात गहन प्रश्न असून कुठली खाती काढून कोणाला द्यायची, यावर अद्यापही एक मत झाले नसल्याने अधिवेशनाच्या तोंडावर आमदारांच्या प्रश्नाला कोण उत्तर देणार? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.